केआरए ज्वेलर्सच्या वतीने साजरा झाला ‘उत्सव स्त्री शक्तीच्या सन्मानाचा’

पुणे : तब्बल ८८ वर्षांची आपली सुवर्ण परंपरा जपणाऱ्या आणि पुण्यातील प्रसिद्ध सुवर्णपेढी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स अर्थात केआरए ज्वेलर्सच्या वतीने नुकताच नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीच्या सन्मानाचा उत्सव साजरा करण्यात आला. नवरात्रीत केआरए ज्वेलर्सच्या सर्व दालनांमध्ये या खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, आणि यामध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या कार्याची दाखल घेत, त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला.
याविषयी अधिक माहिती देताना केआरए ज्वेलर्सचे संचालक अतुल अष्टेकर म्हणाले की, “नवरात्रीचे नऊ दिवस सर्वत्र देवीच्या शक्तीचा गौरव साजरा करण्यात येत असतो. प्रत्येक स्त्री ही त्या दैवी शक्तीचे प्रतिक आहे असे आम्ही मानतो आणि याच शक्तीची, विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करावा, त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी या सामाजिक उद्देशाने आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत समाजातील पोलिस, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी अशा विविध क्षेत्रांत अविरत सेवा देणाऱ्या महिलांना आम्ही आमच्या शहरातील विविध दालनांमध्ये निमंत्रित केले आणि त्यांचा यथोचित सन्मान केला.”
समाजाच्या जडणघडणीत आणि आपल्या सर्वांचेच आयुष्य सुकर करण्यासाठी या महिला जी महत्त्वाची भूमिका बजावतात त्याबद्दल आम्ही कायमच कृतज्ञ असून यावेळी सन्मानचिन्ह, मानपत्र आणि छोटीशी भेटवस्तू देत महिलांचा सत्कार करण्यात आल्याचे अष्टेकर यांनी सांगितले. यावेळी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव व स्नेहल पाटील, विमाननगर पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक हर्षदा शिंदे, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे यांसोबतच अनेक प्रेरणादायी महिलांनी हजेरी लावली.




