World Para Athletics Championships : भारताची जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत विक्रमी 22 पदकांची कमाई

World Para Athletics Championships : भारताने घरच्या मैदानावर झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमी २२ पदके पटकावली. यामध्ये सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि सात कांस्यपदकांचा समावेश आहे. या यशस्वी मोहिमेची सांगता सिमरन, प्रीती पाल आणि नवदीप सिंग यांनी रौप्यपदकांसह केली. भारताने या स्पर्धेत पदकतालिकेत दहावे स्थान मिळवले, जे देशासाठी अभिमानास्पद आहे.
पदकतालिकेत ब्राझील अव्वल, भारत दहाव्या स्थानी
स्पर्धेत ब्राझीलने १५ सुवर्ण, २० रौप्य आणि ९ कांस्यपदकांसह एकूण ४५ पदके जिंकत पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले. चीनने १३ सुवर्ण आणि एकूण ५२ पदकांसह दुसरे स्थान मिळवले, तर इराणने ९ सुवर्ण आणि एकूण १६ पदकांसह तिसरे स्थान मिळवले. भारताने आपल्या उत्कृष्ट कामगिरीसह दहाव्या स्थानावर स्थान मिळवले.
सिमरनचे २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक
महिलांच्या ‘टी १२’ विभागातील २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या सिमरनने २४.४६ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. व्हेनेझुएलाच्या अलेहांद्रा पेरेझ लोपेझ हिला दृष्टीहीन खेळाडूंसाठी मार्गदर्शन धावक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले, ज्यामुळे सिमरनला रौप्यपदक मिळाले. या शर्यतीत ब्राझीलच्या क्लासा बॅरोस डी सिल्वा हिने २४.४२ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. सिमरनने यापूर्वी याच विभागातील १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. “घरच्या मैदानावर आशियाई विक्रम मोडत दोन पदके जिंकल्याचा मला खूप आनंद आहे,” अशी भावना सिमरनने व्यक्त केली.
प्रीती पाल आणि नवदीप सिंग यांचे रौप्य यश
महिलांच्या ‘टी ३५’ विभागातील २०० मीटर शर्यतीत प्रीती पालने चुरशीने लढा दिला, पण ती चीनच्या गुओ कियानकियानला मागे टाकू शकली नाही आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, पुरुषांच्या ‘एफ ४१’ भालाफेक प्रकारात नवदीप सिंगने ४५.४६ मीटर अंतरासह रौप्यपदक मिळवले. नवदीप यापूर्वी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू आहे. या शर्यतीत इराणच्या सादेह बेट सयाह याने ४८.८६ मीटर अंतरासह सुवर्णपदक जिंकले.
पंतप्रधानांकडून कौतुक
भारतीय पॅरा खेळाडूंच्या या ऐतिहासिक यशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन:पूर्वक कौतुक केले. “तुम्ही स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वोत्तम यश मिळवले आहे. तुमची कामगिरी देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले. “संघातील प्रत्येक खेळाडूचा मला अभिमान आहे. तुम्हा सर्वांना भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा,” असेही ते म्हणाले.





