World Cup 2023 : कर्णधार रोहित हा Team India च्या यशाचा खरा हिरो! जाणून घ्या,त्याची कामगिरी…

World Cup 2023 IND vs AUS Final : एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत आणि 20 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून विजय मिळवला. अशा परिस्थितीत चाहत्यांना रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. स्पर्धेत आतार्यंत सलग 10 विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाची नजर आता विश्वचषकावर आहे.
रोहितनं कर्णधार म्हणून तर आपली भूमिका चोख बजावली आहे. त्याबरोबर फलंदाज म्हणूनही तो कुठे मागे राहिलेला नाही. कर्णधार रोहित हा Team India च्या यशाचा खरा हिरो आहे, हे या विश्वचषकातील त्याच्या कामगिरीवरून सिध्द होते. भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आहे, सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली आणि सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांची आकडेवारी याची साक्ष देतात, पण भारतीय कर्णधार रोहित शर्माचे योगदानही अमूल्य आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांच्या मते, भारताचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा खरा हिरो कर्णधार रोहित आहे. रोहित ज्या प्रकारे वेगवान सुरुवात करत आहे, त्यामुळे संघाला चांगली धावसंख्या उभारता आली आहे.
हिटमॅनची भूमिका सुरुवातीलाच येऊन आक्रमक फलंदाजी करायची असते. त्याची बॅट चालली तर विरोधी संघ सुरुवातीलाच हार मानतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा साखळी फेरीचा सामना आणि न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना अशा अनेक सामन्यांमध्ये हे दिसून आले. कर्णधार रोहितने जवळपास सर्वच सामन्यांमध्ये भारताची दमदार सुरुवात आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या स्फोटक उजव्या हाताच्या फलंदाजाचे कौतुक करताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणतात की, रोहित वैयक्तिक विक्रमांऐवजी त्याच्या नैसर्गिक खेळावर लक्ष केंद्रित करतो. या विश्वचषकात रोहितने आपल्या नैसर्गिक शैलीने झटपट धावा करण्याच्या जोखीम पत्करून किमान पाच शतके हुकवली असतील, पण संघाने हे सामना जिंकले आणि कर्णधाराने करोडोंची मने जिंकली.
रोहितच्या 550 धावा…
रोहितच्या फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर या स्पर्धेत आतापर्यंत रोहितने 10 सामन्यात 55.00 च्या सरासरीने आणि 124 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 550 धावा (न्यूझीलंड 47, नेदरलॅड्स 61, द.आफ्रिका 40, इंग्लंड 87, न्यूझीलंड 46, बांगलादेश 48, पाकिस्तान 86,आफगाणिस्तान 131) केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 131 आहे. रोहितने या स्पर्धेत आतापर्यंत एक शतक आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने या विश्वचषकात आतापर्यंत 62 चौकार आणि 28 षटकार मारले आहेत, जे सध्याच्या स्पर्धेतील सर्वोच्च आहे.
सर्वाधिक विजय….
टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून वनडे क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली आहे. एकदिवसीय विश्वचषकात एखाद्या संघाने सलग 10 सामने जिंकण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने सलग दोनदा 11-11 सामने जिंकले आहेत.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक सलग विजय
ऑस्ट्रेलिया (2003, 2007 विश्वचषक स्पर्धेत 11 विजय),
भारत (2003 विश्वचषक स्पर्धेत 10 विजय)
भारत (2003, 2015 विश्वचषक स्पर्धेत 8 विजय)
न्यूझीलंड (1992, 2015 विश्वचषक स्पर्धेत 8 विजय)
वेस्ट इंडिज (1975,1979 विश्वचषक स्पर्धेत 7 विजय)
यापूर्वी भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2008 ते 2009 दरम्यान सलग 9 सामने जिंकले होते. त्याच वेळी, 2017 मध्ये देखील टीम इंडियाने सलग 9 सामने जिंकले होते. पण सलग 10 विजयांचा आकडा कधीच स्पर्श केला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मा हा पहिला भारतीय ठरला आहे ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला सलग 10 सामने जिंकून दिले आहेत. एमएस धोनी आणि विराट कोहलीसारखे कर्णधारही हा पराक्रम करू शकले नाहीत.
सर्वाधिक षटकार…
रोहितनं उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात 29 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 47 धावांची खेळी केली. या दरम्यान रोहित शर्माने एक अनोखा विक्रम केला. रोहित शर्मा विश्वचषकात 50 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात रोहित शर्माच्या नावावर 51 षटकार आहेत. यासह रोहितनं ख्रिस गेलचा 49 षटकार मारण्याचा विक्रम मोडला.
विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार…
51* – रोहित शर्मा (27 डाव)
49 – ख्रिस गेल (34 डाव)
43* – ग्लेन मॅक्सवेल (23 डाव)
37- एबी डिव्हिलियर्स (22 डाव)
37* – डेव्हिड वॉर्नर (27 डाव)
तसेच रोहित शर्मा विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. चालू मोसमात त्याने 28 षटकार मारले आहेत. रोहितने कॅरेबियन फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला. 2015 च्या विश्वचषकात गेलने 26 षटकार मारले होते.
एकाच विश्वचषकात सर्वाधिक षटकार…
28* – रोहित शर्मा (2023)
26 – क्रिस गेल (2015)
24 – श्रेयस अय्यर (2023)
22 – ऑयन मॉर्गन (2019)
22 – डॅरिल मिशेल (2023)
22 – ग्लेन मैक्सवेल (2023)
21 – एबी डिविलियर्स (2015)
21 – क्विंटन डिकॉक (2023)
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या इतिहासात एकूण 13 वेळा आमनेसामने आले आहेत. या 13 विश्वचषक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने 8 सामने तर भारताला केवळ 5 सामने जिंकले आहेत.





