World Cup 2023 Semifinal : उपांत्य लढतींना राखीव दिवस; तरीही पावसाच्या व्यत्ययाने सामने रद्द झाले तर ‘हे’ संघ अंतिम फेरीत…

मुंबई – भारतात सुरु असेलल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यांचा टप्पा रविवारी संपला. आता उपांत्य फेरीचे दोन सामने अनुक्रमे मुंबई व कोलकाता इथे रंगणार आहेत. मात्र, या लढतींमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, या दिवशीही सामना होऊ शकला नाही तर गुणतालिकेतील स्थानाच्या आधारे निर्णय घेतला जाइल व या स्थितीत भारतीय संघ सर्वाधिक गुणांसह अव्वलस्थानी असल्याने त्यांना अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळेल. हेच सुत्र दुसऱ्या उपांत्य लढतीसाठीही कायम राहील.
यंदाच्या स्पर्धेत यजमान भारतीय संघ साखळतील सर्व नऊ सामने जिंकत 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी भारत व न्यूझीलंड यांच्यात तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना दुपारी दोन वाजता सुरू होणार असून या सामन्यात पावसाचा धोका नसला तरी सध्या भारताच्या काही भागात अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे हवामान खात्याने या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राखीव दिवशीही पाऊस पडला तर
यंदाच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. या सामन्यांदरम्यान पाऊस पडल्यास दुसऱ्या दिवशी खेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, षटके कमी केली जाणार नाहीत. राखीव दिवशीही पाऊस पडला आणि डकवर्थ-लुईस पद्धतीने दुसऱ्या डावात नियमानूसार तेवढी षटके खेळली गेली तर निकाल लावला जाणार आहे. मात्र, दुसऱ्या डावात तेवढी षटके टाकता येणे शक्य नसेल, तर गुणतालिकेतील स्थानाच्या आधारे विजेता संघ घोषित केला जाईल व तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.
दरम्यान, टीम इंडियाने चालू वर्ल्ड कपमध्ये सलग नववा विजय मिळवला. 2003 च्या कामगिरीत त्याने सुधारणा केली आहे. त्यावेळी भारताने सलग आठ सामने जिंकले होते. विश्वचषकात सलग सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. 2003 आणि 2007 मध्ये त्यांनी सलग 11 सामने जिंकले होते.





