Women’s Asia Cup 2024 : श्रीलंकेने भारताला हरवून रचला इतिहास, प्रथमच पटकावलं आशिया कपचे विजेतेपद…

Women’s Asia Cup 2024 (IND-W vs SL-W,Final) : महिला आशिया चषक 2024 चा अंतिम सामना आज रविवार, 28 जुलै रोजी भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. डंबुलामध्ये खेळल्या गेलेल्या या विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवून इतिहास रचला. श्रीलंकेचा संघ प्रथमच आशिया चषकाचे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. भारतीय संघाचा यजमान श्रीलंकेच्या संघानं 8 विकेट्सने पराभव करत आशिया कपवर नाव कोरले आहे. चमारी अटापट्टू ही मालिकेची मानकरी ठरली. तिने 5 सामन्यात 304 धावा केल्या. यामध्ये तिने 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली. तसेच गोलंदाजीतही 3 बळी घेतले.
श्रीलंकेच्या संघाने विजयासाठीचे 166 धावांचे लक्ष्य 18.4 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले आणि पहिल्यादाच आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने पहिली विकेट लवकर गमावली. विश्मी गुणरत्ने 1 धावा करून धावबाद झाली. मात्र, कर्णधार चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमाने सावध खेळ करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या दोघींमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी झाली.
#TeamIndia fought hard, but it was Sri Lanka who won the match by 8 wickets.
Scorecard ▶️ https://t.co/RRCHLLmNEt#WomensAsiaCup2024 | #INDvSL | #ACC | #Final pic.twitter.com/YtZMot6dvr
— BCCI Women (@BCCIWomen) July 28, 2024
संघाची धावसंख्या 11.2 षटकातं 94 असताना श्रीलंकेने कर्णधार अटापट्टूच्या रूपानं दुसरी विकेट गमावली. अटापट्टूने 43 चेंडूत 9 चौकार अन् 2 षटकारासह 61 धावांची खेळी केली. त्यानंतर हर्षिता समरविक्रमाने कविष्का दिलहारी हिच्यासोबत 73 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान, समरविक्रमानं 51 चेंडूत 6 चौकार अन् 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 69 तर कविष्कानं 16 चेंडूत 1 चौकार अन् 2 षटकार लगावताना नाबाद 30 धावा केल्या. अशाप्रकारे श्रीलंकेने प्रथमच आशिया कप ट्रॉफी जिंकली.
भारताचे स्वप्न भंगले…
भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेतील 9वा अंतिम सामना खेळत होता. प्रत्येकाला वाटत होते की भारतीय संघ आपले 8 वे विजेतेपद सहज जिंकेल, पण श्रीलंकेने भारताची विजयी घोडदौड रोखली. याआधी भारताने एकही सामना गमावला नव्हता. श्रीलंकेने प्रथमच महिला आशिया कपवर कब्जा केला. आशिया कपबद्दल बोलायचे झाले तर भारताने आतापर्यंत सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय बांगलादेश आणि श्रीलंकेने 1-1 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय…
तत्पूर्वी, विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघांची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 165 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. भारतासाठी स्मृतीने 47 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली, मात्र इतर भारतीय फलंदाज उमा छेत्री (09), हरमनप्रीत कौर (11) आणि शेफाली वर्मा (16) यांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. याव्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्जनंतर रिचा घोषने अखेरच्या षटकांमध्ये शानदार खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्जने 16 चेंडूत 29 धावा तर रिचा घोषने 14 चेंडूत 30 धावा करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
श्रीलंकेकडून गोलंदाजीत कविशा दिलहरीने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय उदेशिका प्रबोधनी, सचिन निशांक आणि चमारी अट्टापथू यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





