World Chess C’ship 2024 : डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा ‘राजा’, डिंगला पराभूत करत ठरला सर्वात तरुण विश्वविजेता….

World Chess Championship 2024 : भारताच्या डी गुकेशने बुद्धिबळाच्या जगात इतिहास रचला आहे. 18 वर्षीय गुकेश हा बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता बनला आहे. FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याने गतविजेत्या डिंग लिरेनचा पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय ग्रँडमास्टरने 14व्या गेममध्ये चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. काळ्या मोहऱ्यांसह खेळताना गुकेशने हा विजय नोंदवला.
GUKESH IS THE 18TH WORLD CHAMPION! 🔥🔥🔥#GukeshDing pic.twitter.com/oWxzbsT8ye
— Chess.com – India (@chesscom_in) December 12, 2024
डोम्माराजू गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहासात अनेक पाने जोडली आहेत. तो बुद्धिबळातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. या विजयासह डी गुकेशने विश्वनाथन आनंदच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आहे. विश्वविजेता बनणारा तो भारताचा दुसरा बुद्धिबळपटू आहे. अशी कामगिरी करणारा विश्वनाथन आनंद हा पहिला भारतीय खेळाडू आहे.
गुरुवारी, 12 डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपच्या 14व्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये (D. Gukesh vs Ding Liren) चुरशीची स्पर्धा होती, जिथे गतविजेता लिरेनने एक छोटीशी चूक केली, जी त्याला महागात पडली आणि गुकेशनं संधीचं सोनं करत विजय मिळवला. यापूर्वी खेळल्या गेलेल्या 13 फेऱ्यांमध्ये दोघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले होते, तर उर्वरित 9 सामने अनिर्णित (ड्राॅ) राहिले होते. अशा स्थितीत दोघांचे समान 6.5 गुण होते.
The emotional moment that 18-year-old Gukesh Dommaraju became the 18th world chess champion 🥲🏆 pic.twitter.com/jRIZrYeyCF
— Chess.com (@chesscom) December 12, 2024
अशा स्थितीत 14 सामना निर्णायक ठरला. हा सामनाही अनिर्णित राहिला असता तर दोघांचे प्रत्येकी 7 गुण झाले असते आणि त्यानंतर टायब्रेकरने निर्णय घेतला गेला असता पण चेन्नईचा चमत्कारी ग्रँडमास्टर गुकेशने ही वेळच येऊ दिली नाही. भारताच्या युवा खेळाडूनं शेवटच्या सामन्यात चिनी ग्रँडमास्टरचा पराभव केला आणि 7.5 – 6.5 अशा फरकाने विजेतेपद पटकावले. 14व्या सामन्यामध्ये डिंग लिरेन पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत होता. अशा स्थितीत त्यांचे वर्चस्व मानले जात होते. पण डी गुकेशने सर्व अंदाज धुडकावून लावत सामना जिंकलाच शिवाय सर्वात तरुण विश्वविजेता बनण्याचा पराक्रमही केला.
World Chess C’ship 2024 (Game 13) : डी गुकेश-डिंग लिरेन यांच्यातील तेरावी फेरी बरोबरीत…
सिंगापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनचा डिंग आणि भारताचा गुकेश यांच्यात चुरशीची लढत सुरू होती. डिंगने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. अशा परिस्थितीत त्याने गतविजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेश केला होता. तर गुकेशने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये चॅलेंजर म्हणून या चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश केला होता. यासह विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. गुकेश पूर्वी रशियाचा गॅरी कास्पारोव्हने 1985 मध्ये अनातोली कार्पोव्हला पराभूत करताना वयाच्या 22 व्या वर्षी जगज्जेतेपद मिळविले होते.





