World Chess C’ship 2024 (Game 13) : डी गुकेश-डिंग लिरेन यांच्यातील तेरावी फेरी बरोबरीत…

World Chess Championship 2024 : भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश आणि गतविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यातील जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप लढतीतील 13वी फेरीही बरोबरीत सुटली त्यामुळे दोघांनाही समान गुण मिळाले.
या अनिर्णित (ड्रा) सामन्यानंतर पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या गुकेश आणि लिरेनचे (D. Gukesh vs Ding Liren) प्रत्येकी 6.5-6.5 गुण झाले आहेत. दोन्ही खेळाडूंनी 69 चालीनंतर बरोबरीसाठी सहमती दर्शवली. चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी दोघांना आता एका गुणाची गरज आहे.
32 वर्षीय लिरेनने पहिली फेरी जिंकली होती तर 18 वर्षीय गुकेशने तिसरी फेरी जिंकून बरोबरी साधली होती. यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सने सलग सात ड्रॉ खेळले. त्यानंतर गुकेशने 11वी फेरी जिंकून 6-5 अशी आघाडी घेतली होती मात्र लिरेनने पुढच्याच म्हणजे 12व्या फेरीत भारतीय खेळाडूचा पराभव करत पुन्हा एकदा बरोबरी साधली.
एकूण 14 पैकी 13 फेऱ्यानंतर दोन्ही खेळाडू आता जेतेपदापासून फक्त 1 गुण दूर आहेत. चौदा फेऱ्यानंतरही निकाल बरोबरीत राहिल्यास, ‘फास्टर टाइम कंट्रोल’द्वारे विजेता निश्चित केला जाईल.





