World Chess C’ship 2024 (Game 12) : डी. गुकेशचा पराभव करत ‘डिंग लिरेन’ने केलं पुनरागमन, WCC स्पर्धा पोहचली रंगतदार स्थितीत…

World Chess Championship 2024 (D. Gukesh vs Ding Liren) : भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशला सोमवारी सिंगापूर येथे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 12व्या गेममध्ये गतविजेता चीनच्या डिंग लिरेनकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे दोघांचे गुण आता प्रत्येकी 6-6 असे सम-समान झाले आहेत.
सलग सात सामने अनिर्णित राहिल्यानंतर, 18 वर्षीय गुकेशने रविवारी 11 वा गेम जिंकून चिनी खेळाडूवर एक गुणांची आघाडी प्रस्थापित केली होती, परंतु 32 वर्षीय लिरेनने पुढच्याच गेममध्ये विजय मिळवताना बरोबरी साधली आहे.
‘क्लासिकल’ फॉरमॅटमधील 14 पैकी 12 गेमनंतर दोन्ही खेळाडू आता जेतेपदापासून 1.5 गुण दूर आहेत. चौदा गेमनंतरही निकाल बरोबरीत राहिल्यास, ‘फास्टर टाइम कंट्रोल’द्वारे विजेता निश्चित केला जाईल. याआधी लिरेनने या सामन्यातील सुरुवातीचा गेम जिंकला होता तर गुकेश तिसऱ्या आणि रविवारी 11 व्या गेमचा विजेता ठरला होता. दोघांमधील आठ सामने अनिर्णित राहिले.
दरम्यान, अवघ्या 18 वर्षांच्या गुकेशला सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता बनण्याची संधी आहे. 7.5 गुणांपर्यंत पोहोचणारा पहिला खेळाडू चॅम्पियन होईल. चॅम्पियनशिपमध्ये दोघांमध्ये अजून 2 सामने बाकी आहेत.





