World Chess Championship 2024 (D. Gukesh vs Ding Liren) : भारताचा युवा ग्रँडमास्टर गुकेश डोम्माराजू बुद्धिबळाच्या जगात इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध अनेक फेऱ्या अनिर्णित राहिल्यानंतर अखेर गुकेशने नेत्रदीपक विजयाची नोंद करत विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडी घेतली.
सिंगापूर येथे रविवार, 8 डिसेंबर रोजी खेळल्या जात असलेल्या या चॅम्पियनशिपच्या 11 व्या सामन्यात पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत असलेल्या गुकेशने 29 चालींमध्ये डिंगचा पराभव केला आणि विजेतेपदाच्या शर्यतीत 1 गुणांची आघाडी घेतली.
याआधीच्या अनेक फेऱ्यांप्रमाणेच या दोघांमध्येही चुरशीची स्पर्धा सुरू होती, पण नंतर 28व्या चालीवर चीनच्या ग्रँडमास्टर आणि गतविजेत्याने मोठी चूक केली आणि त्याच्या पुढच्याच चालीमुळे गुकेशने डिंगला राजीनामा (रिजाइन) देण्यास भाग पाडले.
World Chess Championship 2024 : डी गुकेश-डिंग लिरेन यांच्यातील दहावी फेरीही बरोबरीतच…
या चॅम्पियनशिपमधील 11 फेऱ्यांमधील गुकेशचा हा दुसरा विजय असून आता त्याने 6.0-5.0 गुणांसह प्रथमच आघाडी घेतली आहे. चॅम्पियनशिपचा पहिला सामना डिंगने जिंकला, तर गुकेशने तिसरा सामना जिंकला होता. उर्वरित सर्व सामने अनिर्णित राहिले. अवघ्या 18 वर्षांच्या गुकेशला सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता बनण्याची संधी आहे. 7.5 गुणांपर्यंत पोहोचणारा पहिला खेळाडू चॅम्पियन होईल. चॅम्पियनशिपमध्ये दोघांमध्ये अजून 3 सामने बाकी आहेत.