क्रिकेटच्या ‘पंढरी’त जगज्जेत्यांची भव्य’वारी’! स्वागतासाठी उसळला जनसागर

T20 World Cup 2024 – टी-२० विश्वकरंडकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ आज मायभुमीत दाखल झाला. सकाळी दिल्ली विमानतळावर भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
यानंतर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत जगज्जेत्यांची मरीन ड्राईव्हपासून वानखेडे मैदानापर्यंत लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत भव्य ‘वारी’ निघाली.
मुंबईत भारतीय संघ दाखल होण्यापूर्वीच मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी भारतीय संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत ही विजयी यात्रा डबल डेकर ओपन बसमधून पार पडली. याप्रसंगी क्रिकेटच्या चाहत्यांनी भारत माता की जय अशा जयघोष करत भारतीय संघाचे अभिनंदन केले.
चाहत्यांचेही अनेकांकडून कौतुक !
मरीन ड्राईव्ह परिसरात एवढ्या मोठ्या गर्दीमधून एक वेगळे दृष्य पाहायला मिळाले आहे. मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दीतून एका ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन दिला आहे.
या प्रसंगाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हवर एवढ्या मोठ्या गर्दीमधूनही ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी काही सेंकदात रस्ता मोकळा करून दिल्यामुळे अनेकांकडून कौतुकही करण्यात येत आहे.





