World Bank Loan: महापालिकेचे दिवाळे? नाशिक फाटा उड्डाणपूल ठरतोय ‘पांढरा हत्ती’; काय आहे जागतिक बँकेच्या कर्जाचा जाच
World Bank Loan: जागतिक बँकेकडून डॉलरमध्ये घेतलेले १५९ कोटींचे कर्ज ठरतेय डोकेदुखी; २०३९ पर्यंत परतफेड करावी लागणार असल्याने पालिका अडचणीत.

World Bank Loan – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात दुमजली उड्डाण पुल बांधण्यासाठी जागतिक बँकेकडून १५९ कोटी ११ लाखांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज डॉलरमध्ये फेडण्याची अट असल्याने आणि एकरकमी रक्कम स्वीकारली जात नसल्याने महापालिकेचे दिवाळे निघाले आहे. हे कर्ज फेडत असतानाच घाम फुटलेल्या पालिकेने आता पुन्हा या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
त्यासाठी १ कोटी १५ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पूल तयार होऊन जेमतेम दहा वर्ष झालेली असताना आता दुरुस्तीसाठी आणखी सव्वा कोटी खर्च होणार आहेत. महापालिकेने मोठा गाजावाजा करीत निगडी ते दापोडी ग्रेडसेपरेटर मार्ग निर्माण केला. त्या मार्गास अडथळा ठरणाऱ्या लाखो घरे व दुकानांवर महापालिकेने बुलडोजर फिरवला.
निगडी ते दापोडी मार्ग विनासिग्नल असल्याने त्या मार्गावरील नाशिक फाटा चौकात भारतरत्न उद्योजक जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, सिग्नल फ्री रस्त्याची महापालिकेची घोषणा हवेतच विरली. मार्ग व पूल होऊन अकरा वर्षे झाले तरी, अद्याप हा मार्ग सिग्नल फ्री झालेला नाही. दरम्यान, नाशिक फाटा पुलाचा खर्च अधिक असल्याने महापालिकेने जागतिक बँकेचे १५९ कोटी ११ लाखांचे कर्ज जानेवारी २०१५ ला घेतले.
कासारवाडीहून भोसरीच्या दिशेने आणि भोसरी-पिंपळे गुरव या भागांना जोडणारा असे दोन पुल आहेत. हे पुल दापोडी-निगडी जुना महामार्ग, पुणे-लोणावळा लोहमार्ग आणि पवना नदी ओलांडून गेले आहेत. त्यामुळे शहराचे दक्षिण व उत्तर भाग एकमेकांना जोडले गेले आहेत.
जागतिक बँकेकडून घेतलेले हे कर्ज डॉलरमध्ये घेण्यात आले. ते फेडण्याची अटही डॉलरमध्येच आहे. तसेच, कर्ज मध्येच एक रक्कमी फेडता येणार नाही, अशा अटीसह महापालिकेने हे कर्ज घेतले होते. जानेवारी २०१५ ते मार्च २०२६ दहा वर्षांत महापालिकेने ७६ कोटी रूपयांचे कर्जाचे मुद्दल फेडले आहे. व्याजापोटी १७ कोटी रूपये फेडले आहेत. गेल्या दहा वर्षांत डॉलरचे भाव वाढतच आहेत.
सध्या एका डॉलरचा भाव ९४ रूपये ४० पैसे इतका आहे. डॉलरचे भाव सातत्याने वाढत असल्याने महापालिकेला २०७ कोटींपेक्षा अधिकचे मुद्दल व व्याज फेडायचे आहे. ते कर्ज महापालिकेने २५ वर्षांसाठी काढले आहे. त्यांची परतफेड २०३९ पर्यंत करायची आहे. आता अकरा वर्षे झाले आहेत. अजून १४ वर्षे ते कर्ज फेडावे लागणार आहे. भविष्यात डॉलरचा भाव वाढतच राहणार आहे.
त्यामुळे कर्जाची रक्कमही वाढतच जाणार आहे. डॉलरनुसार परतफेडीच्या जाचक अटीमुळे हे कर्ज तब्बल ३० टक्के वार्षिक व्याज दराने पडत आहे. असे असतानाच आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. त्यामध्ये स्थापत्य विषयक कामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
दहा वर्षांत दुरुस्तीवर खर्च
सन २०१५ मध्ये या पुलाच्या कामासाठी महापालिकेने कर्ज काढले. त्यानंतर २०१६ मध्ये पूलाचे काम करण्यात आले. त्याला अद्याप दहा वर्ष देखील पूर्ण झाले नाही. असे असतानाच पुन्हा दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.






