युक्रेनमधील भारतीयांना आणण्यासाठी अथक प्रयत्न करतोय; प्रचार सभेत मोदींचे प्रतिपादन

बस्ती – युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारकडून अथक प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. आज उत्तरप्रदेशातील बस्ती येथे घेतलेल्या एका प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, भारताने नेहमीच आपल्या देशातील नागरीकांना प्राधान्य दिले आहे.
ते म्हणाले की आज जगात अत्यंत गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून अशा स्थितीत भारताला पुर्ण आत्मनिर्भर बनवण्याची गरज आहे. या अनुषंगाने विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की अन्य पक्षाच्या केंद्रातील सरकारांनी देशाला विदेशातील आयातीवर निर्भर केले होते. संरक्षण दलातील सामग्रीही मोठ्या प्रमाणात विदेशातून आयात केली जात होती. पण भारताने आता या बाबतीतही आत्मनिर्भरतेचा मंत्री जपला आहे असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मतदारांना जात, पंथ आणि धर्माच्या भिंती तोडून आत्मनिर्भर भारतासाठी मतदान करण्याच आवाहन केले.समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस मधील घराणेशाहीवर टीका करताना ते म्हणाली की ही लढाई कट्टर देशभक्ती विरूद्ध परिवार भक्ती यांच्यात आहे. आम्ही कायमच देशभक्तीला प्राधान्य दिले आहे असे ते म्हणाले. काल बालाकोट हल्ल्याचा स्मरण दिन होता.
त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, 26 फेब्रुवारीला आपल्या हवाईदलाने पाकिस्तानात घुसुन बालाकोटला हल्ला केला पण परिवारवादी राजकीय पक्षांनी त्याचेहीं पुरावे मागितले. या परिवारवाद्यांनी नेहमीच देशाचे पैसे खिशात घातले, घटनाही खिशातच ठेवली आणि गरीबांना त्यांनी आपल्या पायापाशीच ठेवले असे ते म्हणाले. आपल्या सरकारकडून उत्तरप्रदेशात संरक्षण उत्पादनाचा कॉरिडॉर बनवला जात आहे असे ते म्हणाले.





