‘मविआकडून विकासविरोधी दृष्टीकोनातून काम’; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल !

मुंबई – गेली सव्वा दोन वर्ष सरकारने कामाचा धडाका लावला आहे. जवळपास 900 निर्णय सरकारने घेतले आहेत. साठ ते सत्तर कॅबिनेट बैठका घेतल्या आहेत. सर्व सामान्यांसाठी योजना आणल्या आहेत. या कामाच्या धडाक्याचा धसका विरोधकांनी घेतला आहे.
त्यामुळे ते सध्या गडबडलेले आहोत. विरोधक हे विकासविरोधी दृष्टीने काम करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच त्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे. त्यांना आता पराभव समोर दिसू लागला आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना फटकारले.
महायुतीकडून गेल्या सव्वा दोन वर्षाच्या केलेल्या कामांचा लेखाजोखा रिपोर्टकार्डच्या माध्यमातून मांडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, मविआच्या अडीच वर्षात राज्य मागे गेले होते. जर आमचे सरकार आले नसते, तर हे राज्य आणखी मागे गेले असते. आम्ही काम करणारे आहोत. आम्ही सर्व सामान्यांना न्याय देणारे आहोत. लोकसभेला लोकांना फसवून जिंकले. पण आता जनता फसणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विरोधक पोलखोल करणार म्हणून सांगत आहेत. सत्तेत आल्यास महायुती सरकारच्या योजना बंद करणार असे जाहीर पणे सांगत आहेत. पण तुमची पोलखोल आधी झालीच आहे. त्यामुळे योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला तर त्याचा करेक्ट कार्यक्रमच झाला समजा, असा इशाराही त्यांनी दिला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक योजना या बंद पडल्या होत्या. मेट्रोच्या कारशेडचेही काम बंद पाडले. बालहट्टामुळे ते काम बंद होते. त्याला त्यावेळीच्या सरकारचा अहंकार नडला. त्यामुळे सतरा हजार कोटीचा जास्त खर्च झाला.
तो जर वाचला असता तर लाडक्या बहीणीसाठी आम्हाला आणखी जास्त पैसे देता आले असते. सरकारने उद्योग, शेतकरी, तरूण, महिला, ज्येष्ठ नागरीक अशा समाजातल्या प्रत्येक घटकासाठी योजना आणल्या आहेत. त्याचा ते लाभ घेत आहेत. त्यामुळे विरोधकांना आता पराभव तोंडा समोर दिसत आहे असे ते म्हणाले.





