भाजपमध्ये कार्यकर्ते, नेते घडवले जातात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे – भारतीय जनता पक्षात नेते, कार्यकर्ते घडविले जातात. कार्यकर्त्यांची क्षमता पाहुन विविध पदांवर संधी दिली जाते. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवक ते केंद्रीय राज्यमंत्री हा मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास कौतुकास्पद असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, प्रथम वर्ष कार्य अहवालाच्या प्रकाशनावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
करोना काळातील मोहोळ यांच्या कामाचे संकलन असलेल्या प्रथम माणुस या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भिमराव तापकीर, सुनिल कांबळे, हेमंत रासने, सिध्दार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, दिलीप कांबळे, राजेश पांडे यांच्यासह श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राष्ट्र्वादी काँगेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, अजय भोसले, आरपीआयचे परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
पुणेकराच्या समस्या सोडविण्यासाठी मोहोळ यांचे नवे जनसंपर्क कार्यालय महत्वाचे ठरणार असल्याचे सांगून फडणीवीस म्हणाले, मोहोळ यांचे नवे कार्यालय चोवीस तास सुरु राहणार असून असे कार्यालय असलेले मोहोळ हे देशातील एकमेव खासदार ठरतील.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, माहिती, मदतीची माहिती येथे मिळणार आहे. हे कार्यालय सामान्य माणसाला हक्काचे घर वाटेल. केंद्रीय राज्यमंत्री पदावरील वर्षातील मोहोळ याचे कार्य हा ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे. त्यांचे काम हाच पाच वर्षाच्या कार्याचा अहवाल ठरेल.
मोहोळ म्हणाले, पुणेकरांनी वेगवेगळ्या पदावर काम करण्यांची संधी दिली. त्यांच्या आशीवार्दाच्या जोरावर लोकसेवेचा प्रवास सुरु आहे. पुणे देशातील सर्वौत्तम बनण्यासाठी पुण्याचे प्रश्न सोडविण्यास कायम प्राधान्य देणार.





