पुणे जिल्हा | कामचुकार कर्मचाऱ्यांची गय करणार नाही

भोर, (प्रतिनिधी) – नागरिकांची कामे वेळेत करा, त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावू नका. नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यामध्ये कामचुकारपणा अथवा कसूर केल्यास संबंधितांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही, अशा शब्दात आमदार संग्राम थोपटे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोर तालुका समन्वय समिती आढावा बैठकीत खडसावले.
यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय वागज, नायब तहसीलदार अरूण कदम, शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भाटघर धरणाच्या वेळवंड व भूतोंडे खोऱ्यात बॅक वॉटरमधून बेकायदेशीर पाणी उचलले जात आहे. बेकायदेशीर बांधकाम होत आहेत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. त्यावर याबाबत पाहणी करून विनापरवाना पाणी उचलणाऱ्यांच्या वीज मोटारी जप्त करून कारवाई करावी, अनधिकृत बांधकामे पाडावीत, अशा सूचना आमदार थोपटे यांनी केल्या. प्राथमिक शाळेत शिक्षक कमी आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणांवर परीणाम होत आहे.
वीसगाव खोऱ्यातील रामओढ्याचे पाणी धोम बळकवडी कालव्यात सोडले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे पाणी कमी मिळते. उपजिल्हा रूग्णालयात स्वच्छता नाही, शवविच्छेदन वेळेवर होत नाही, शहरात अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे होत आहेत. या तक्रारीवर थोपटे यांनी संबंधित विभाग प्रमुखांनी तातडीने कारवाई करावी, अशा सूचना दिल्या.
ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे काम करताना २३ नंबरला नोंद न घेता केली जातात, अशी तक्रार आली. त्यावर संबंधित विभाग प्रमुखांना खुलासा करता आला नाही. मात्र, अशा प्रकारे कामे होत असतील तर त्याची चौकशी करून कारवाई करावी, असे थोपटे यांनी सूचित केले.
यावेळी तहसीलदार श्रीनिवास ढाणे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, माजी सभापती दिनकर सरपाले, माजी जि.प. सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाले, नाना राऊत, शिवराज शेंडकर, ग्रामस्थ, अधिकारी उपस्थित होते. यावेळी वेल्हे ते चेलाडी नसरापूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
पशुसंवर्धन विभागीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एकाच डॉक्टरांवर तालुक्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी काढलेल्या पीक विम्याचे पैसे कृषी विभागाकडून अजून मिळालेले नाहीत. जिल्हा बँकेत शेतकऱ्यांना सोसायटी कर्ज सेवा सुरळीत मिळत नाही, अशा तक्रारी उपस्थित ग्रामस्थांनी केल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून समस्या, अडचणी सोडवाव्यात, असे सूचवण्यात आले.
मोसे बुद्रुक, आंबेड, पानशेत, गिवशी, अंबवणे येथील पाणी पुरवठा योजनांच्या तक्रारीवर बोलताना थोपटे यांनी संबंधितांनी जागेवर जाऊन पाहणी करून लेखी अहवाल द्यावा, असे सांगितले. कामचुकारपणा करू नका. कामात कसूर केली तर गय करणार नाही, असे खडे बोल थोपटे यांनी सुनावले. या वेळी चांगले काम करणाऱ्र्या ग्रामसेवकांचा सन्मान आमदार संग्राम थोपटे व प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांचे हस्ते करण्यात आला.
वेल्ह्यात तक्रारींचा पाउस
कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची कामे करत नाहीत. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व ठेकेदार यांच्यातील अर्थपूर्ण संबंधामुळे रस्त्यांची कामे निकृष्ट व हलक्या दर्जाची केली जातात. गुंजवणी नदीवरील छोटेपाटबंधारे विभागाच्या अनेक बंधाऱ्यांची गळती सुरू आहे. अशा अनेक तक्रारीचा पाढा स्थानिकांनी थोपटें यांच्यासमोर वाचला.





