Bhor News – भोर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. रामबाग येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावाला ‘राजमाता जिजाऊ’ तर एसटी बसस्थानकासमोरील नवीन व्यापारी संकुलाला ‘धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा जयश्री शिंदे यांनी नामकरणाचा प्रस्ताव मांडला, ज्याला नगरसेवक श्रीकांत देशपांडे यांनी अनुमोदन दिले. सुमारे चार तास चाललेल्या या सभेत एकूण ३२ विषयांवर चर्चा करण्यात आली. या सभेस मुख्याधिकारी गजानन शिंदे, उपनगराध्यक्षा जयश्री शिंदे, भाजपाचे गटनेते अमित सागळे, नगरसेवक जगदीश किरवे, सुमंत शेटे, जयवंत शेटे, सचिन तारू, तृप्ती सुपेकर, मनीषा पवार, स्नेहल घोडेकर, रेणुका बदक, मनीषा भेलके, पल्लवी सागळे, केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, स्नेहा पवार, मयुरी गायकवाड, प्रशांत जाधव, तोशिफ आतार, कुणाल पलंगे, गणेश मोहिते, अनिल भेलके, सुरेखा मळेकर उपस्थित होते. भोर जलतरण तलाव सर्वसाधारण सभेपुढे ठेवलेल्या विविध विषयांपैकी पाच ते सहा विषय वगळता सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. तर, काही ठिकाणी सुधारणा सुचवण्यात आल्या. चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे आणि तेथील लिफ्टची क्षमता वाढवून दुरुस्ती करणे. नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे. शहरात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे. नगरपालिका हद्दीतील दफनभूमी व मंदिरांची शासकीय नियमानुसार होणारी कर आकारणी रद्द करणे. भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या मालासाठी साठवणूक व्यवस्था करणे, हे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामे सुचवण्यावरून सभेत वाद पाहायला मिळाला. ज्या प्रभागात कामे होणार आहेत, त्यांची नावे स्पष्ट असावीत, अशी भूमिका भाजप नगरसेवक जगदीश किरवे यांनी मांडली. तर निधी परत जाऊ नये म्हणून कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करणे आवश्यक असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक केदार देशपांडे यांनी सांगितले. अखेर मागील अर्धवट कामे पूर्ण करण्याच्या अटीवर हा विषय पुढील सभेसाठी ठेवण्यात आला. याशिवाय, पालिकेच्या सभांचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव भाजप सदस्यांच्या विरोधामुळे नामंजूर करण्यात आला.