Shashi Tharoor : ‘मला खेद वाटतो…’, ऐतिहासिक विजयानंतर शशी थरुर यांनी टीम इंडियाची मागितली माफी, काय होतं कारण?
IND vs ENG Shashi Tharoor Apologises Team India : भारताने सोमवारी द ओव्हल येथे झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ‘एक्स’वर भारतीय संघाच्या या शानदार कामगिरीचे आणि विशेषत: वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या अप्रतिम खेळीचे कौतुक केले.
शशी थरूर यांनी लिहिले, “माझ्याकडे शब्द नाहीत… काय अप्रतिम विजय! इंग्लंडविरुद्धच्या या विजयाबद्दल मी भारतीय संघासाठी खूप उत्साहित आहे. सामन्यादरम्यान दाखवलेला संयम, दृढनिश्चय आणि उत्साह अविश्वसनीय होता. हा संघ खास आहे.” आता या युवा भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘मला खेद वाटतो’ – शशी थरुर
Words fail me….WHAT A WIN! 🇮🇳🏏 Absolutely exhilarated & ecstatic for #TeamIndia on their series-clinching victory against England! The grit, determination, and passion on display were simply incredible. This team is special.
I am sorry that I expressed a spasm of doubt about…— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 4, 2025
यापूर्वी थरूर यांनी भारताच्या विजयाच्या शक्यतेवर शंका व्यक्त केली होती. त्यांनी आपली चूक मान्य करताना सांगितले, “काल मी निकालाबाबत थोडी शंका व्यक्त केली होती, याचा मला खेद वाटतो. पण मोहम्मद सिराजने कधीही विश्वास सोडला नाही! आपल्या हिरोंना सलाम.” मोहम्मद सिराजच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने हा सामना जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली.
परदेशात प्रथमच पाचव्या कसोटीत विजय –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने प्रथमच परदेशात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जिंकला आहे. यापूर्वी भारताने परदेशात 16 वेळा पाच कसोटी सामन्यांच्या मालिका खेळल्या होत्या, ज्यात 6 वेळा शेवटच्या सामन्यात पराभव, तर 10 वेळा सामना अनिर्णित राहिला होता. अखेर भारतीय संघाने ही ऐतिहासिक कामगिरी करत हा टप्पा गाठला.
रूट-ब्रूकची शतकी खेळी ठरली व्यर्थ –
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी शतकी खेळी करत संघाला आघाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. ब्रूकने 91 चेंडूंमध्ये शतक झळकावत 111 धावा केल्या, ज्यात 14 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रूटने 110 धावांची खेळी केली. सलामीवीर बेन डकेटनेही 54 धावांची उपयुक्त खेळी केली. मात्र, पाचव्या दिवशी सिराज आणि कृष्णा यांनी शानदार गोलंदाजी करत तीन विकेट झटपट घेतले. दुखापतीनंतरही ख्रिस वोक्स फलंदाजीसाठी उतरला, पण त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. सिराजने दुसऱ्या डावात 5, तर कृष्णाने 4 विकेट घेतल्या. गस ॲटकिन्सन 17 धावा काढून शेवटचा फलंदाज म्हणून बाद झाला.





