Pune District : पैशासाठी छत्रपती कारखाना बंद पडू देणार नाही – पृथ्वीराज जाचक
Pune District : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा गुरुवारी (दि. १७) सकाळी पार पडला.

भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा पैशाअभावी कधीही बंद पडणार नाही. वेळ पडल्यास पृथ्वीराज जाचक स्वतः ला विकेल, पण कारखाना बंद पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ११ ते १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऊस उत्पादक सभासदांनी आपल्याच कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे, असे भावूक आवाहन श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा गुरुवारी (दि. १७) सकाळी पार पडला. युनिट नं. १ च्या ७१ व्या गळीत हंगामाचे पूजन संचालक निलेश टिळेकर व त्यांच्या पत्नी रश्मी टिळेकर यांच्या हस्ते, तर युनिट नं. २ च्या १० व्या गळीत हंगामाचे पूजन संचालक संतोष मासाळ व त्यांच्या पत्नी वैशाली मासाळ यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाले.
कारखान्याची तयारी पूर्ण
पुणे जिल्ह्यात सर्वात पहिले बॉयलर पूजन छत्रपती कारखान्याचे झाले असून १ ऑक्टोबरला कारखाना सुरू करण्याची पूर्ण तयारी कामगारांनी केली आहे. दिवंगत अजित पवार यांची आठवण सांगत जाचक भावूक झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यासमोरील अडचणी दूर केल्या जात असल्याचे जाचक यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर, संचालक अॅड. शरद जामदार, डॉ. योगेश पाटील, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, अशोकराव पाटील, विठ्ठलराव शिंगाडे, तानाजी शिंदे, प्रशांत दराडे, अनिल काटे, कैलास गावडे, सतीश देवकाते, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, टेक्निकल हेड महादेव निकम, चिफ केमिस्ट अमर जगताप, चिफ इंजिनिअर निखिल रणवरे, मुख्य शेती अधिकारी जालिंदर शिंदे व सर्व अधिकारी कामगार सभासद उपस्थित. यावेळी राजाराम रायते, अॅड. संभाजी काटे, बाळासाहेब शिंदे, शंकराव रुपनवर, रामचंद्र निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
११ लाख मेट्रिक टन गाळपाचे नियोजन
येत्या गळीत हंगामासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील २३, ६४८ एकर क्षेत्रातील अंदाजे ८ लाख मेट्रिक टन आणि कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन उसाचे ३ लाख मेट्रिक टन, असे एकूण ११ ते १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे.
सलग ७ ते ८ वर्षे ११ ते १२ लाख टन गाळप झाले तरच कारखाना पूर्णपणे आर्थिक संकटातून बाहेर पडेल. वेळेत धन, १००० किलोचा टन आणि वेळेत धन, पैसे रोख; छत्रपतीला ऊस घाला बिनधोक हे ब्रीद लक्षात ठेवून आपल्या पुढच्या पिढीच्या अन् आपल्या वाडवडिलांनी उभारलेल्या वैभवाच्या रक्षणासाठी सभासदांनी ऊस बाहेर न घालवता छत्रपती कारखान्यालाच द्यावा.
-पृथ्वीराज जाचक,अध्यक्ष, श्री छत्रपती सह. साखर कारखाना.





