Rajgurunagar : खेड तालुक्यात अजित जनसंवाद विकास अभियानाचा शुभारंभ
Rajgurunagar : आंबेठाण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतील प्राथमिक शाळेला भेट देऊन भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.

राजगुरुनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘अजित जनसंवाद विकास अभियानचा शुभारंभ खेड तालुक्यातील पाईट–आंबेठाण जिल्हा परिषद गटातून करण्यात आला. जिल्ह्यातील ७३ जिल्हा परिषद गटांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांच्या उपस्थितीत दिवसभर विविध उपक्रम घेण्यात आले.
अभियानांतर्गत ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्रांची पाहणी करून लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. या दौऱ्याचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी केले. यावेळी माजी सभापती शरद बुट्टे पाटील, गणेश बोत्रे, पंचायत समिती सदस्य श्रद्धा मांडेकर, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, बांधकाम कार्यकारी अभियंता हेमंत चौगुले, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले आदी उपस्थित होते.
आंबेठाण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतील प्राथमिक शाळेला भेट देऊन भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला. कोरेगाव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य उपकेंद्राचीही पाहणी करण्यात आली. पाईट येथे झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात आंबेठाण, कोरेगाव खुर्द, गोणवडी, पिंपरी खुर्द, भांबोली, कोळीये, गडद, देवतोरणे, हेदृज, पाईट, तळवडे, रौंधळवाडी, कोये, धामणे, कुरकुंडी, किवळे, अहिरे, कोरेगाव बुद्रुक आदी गावांतील नागरिकांनी विविध मागण्यांची निवेदने दिली.
यानंतर झालेल्या शासकीय बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभागातील कामांचा आढावा घेण्यात आला. मुदत संपूनही कामे प्रलंबित ठेवणाऱ्या कंत्राटदारांकडून कामे काढून घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी सूचना अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी केली.
सुनीता बुट्टे पाटील यांनी अर्धवट अंगणवाडी कामे, रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी निधी, शिक्षकांच्या रिक्त जागा, आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारती, अतिवृष्टीग्रस्त कामांची दुरुस्ती आणि जल जीवन मिशनच्या अपूर्ण योजनांसाठी निधीची मागणी केली.
या बैठकीला सुनील भोईर, विलास माने, श्रीकर येवले, रूपाली तांदळे, कलिका खरात, सोनाली पवार, साळुंखे, दीपक जम्बुकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पाईट पाझर तलावाची पाहणी करून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले.अभियान यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय मांडेकर, सुनील देवकर, तुकाराम गवारी, शरद निखाडे, पल्लवी जयसिंग दरेकर, ज्योती कुंभार, परविन इनामदार, भरत रौंधळ, नितीन डांगले, सुनील डांगले, सागर राळे, नितीन वाघमारे यांनी प्रयत्न केले.
पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावाच्या मूलभूत गरजा आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी ‘अजित जनसंवाद विकास अभियान’ महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी आणि जल जीवन मिशनच्या अपूर्ण कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
-सुनीता बुट्टेपाटील, सदस्या, जिल्हा परिषद.





