Women’s U19 T20 Asia Cup 2024 : टीम इंडिया विजेतेपदापासून एक पाऊल दूर; अंतिम फेरीत बांगलादेशशी सामना…

Women’s U19 T20 Asia Cup 2024 (IND vs BAN Final Match) : टीम इंडिया महिला अंडर 19 टी-20 आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. एकीकडे भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सुपर फोरमध्ये श्रीलंकेचा पराभव केला. दुसरीकडे बांगलादेशने सुपर फोरमध्ये नेपाळचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. आता टीम इंडिया आता फायनलमध्ये बांगलादेशशी भिडणार आहे. अंतिम सामना रविवारी (22 डिसेंबर 2024) भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजता खेळवला जाईल. भारतीय संघाने स्पर्धेतील एका सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. टीम इंडिया आता जेतेपदाच्या जवळ आहे.
सुपर फोरमध्ये बांगलादेश विजयी…
वास्तविक, सुपर फोरच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर बांगलादेशने नेपाळचा पराभव केला आहे. सुपर फोरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 11 षटकात 8 गडी गमावून 54 धावा केल्या होत्या. यादरम्यान कर्णधार पूजा महतो 9 धावा करून बाद झाली. सावित्री धामी 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. प्रत्युत्तरात बांगलादेशने 1 गडी गमावून 9.5 षटकात 58 धावा करत लक्ष्य गाठले. संघासाठी फाहोमिदाने सर्वाधिक 26 धावांची तर मस्ट इव्हाने 18 धावांचे योगदान दिले.
The Super 4’s have concluded, and India tops the points table with 7 points, followed closely by Bangladesh with 6 points—both securing their spots in the finals. Nepal and Sri Lanka bow out after a hard-fought campaign. #ACCWomensU19AsiaCup #ACC pic.twitter.com/kpAiKWPYWE
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 20, 2024
अंतिम फेरीत भारत-बांगलादेश आमने-सामने…
टीम इंडियाचा अंतिम सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. संघानं या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. याआधी टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने ग्रुप स्टेजच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव केला. यानंतर सुपर-4 मध्ये टीम इंडियाने बांगलादेश आणि आता श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्याचे तिकीट मिळवले.
आयुषी शुक्लाची दमदार कामगिरी…
भारतीय गोलंदाज आयुष शुक्लाने या स्पर्धेत वर्चस्व गाजवले. तिने आतापर्यंत 7 विकेट घेतल्या आहेत. आयुषीने सुपर फोरच्या सामन्यातही अप्रतिम गोलंदाजी केली होती. आता तिच्याकडून अंतिम फेरीतही चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असेल. तर फलंदाजीत गोंगडी त्रिशाने कमाल केली आहे. तिने आतापर्यंत एकूण 107 धावा केल्या आहेत.





