Women’s T20 World Cup 2024 : बांगलादेशची विजयी सलामी, स्कॉटलंडचा 16 धावांनी केला पराभव…

ICC Women’s T20 World Cup 2024 (BAN vs SCO) : महिला टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना गुरुवारी बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात खेळला गेला. बांगलादेशने हा सामना 16 धावांनी जिंकला. रितू मोनीने संघासाठी दमदार कामगिरी केली. तिनं 4 षटकात केवळ 15 धावा देत 2 बळी घेतले. रितूला ‘सामन्याची मानकरी’ म्हणून गौरविण्यात आलं. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 119 धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात स्कॉटिश संघ केवळ 103 धावाच करू शकला.
नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशी संघ प्रथम फलंदाजीला आला आणि संघातील राणी आणि मुर्शिदा खातून सलामीला आल्या. राणी 32 चेंडूत 29 धावा तर मुर्शिदा 12 धावा करून बाद झाली. शोभनाने 38 चेंडूत 36 धावांची उपयुक्त खेळी खेळली. तिने दोन चौकार मारले. ताज नेहरला खातेही उघडता आले नाही. कर्णधार निगार सुलतानाने 18 धावा केल्या. शेवटी फहिमा खातूनने दमदार परफॉर्मन्स दिला. तिने 5 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या. तिच्या खेळीत 2 चौकारांचा समावेश होता. अशाप्रकारे बांगलादेशने 20 षटकांत 7 गडी गमावून 119 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.
ICC Women’s T20 World Cup 2024
Bangladesh 🆚 ScotlandBangladesh won by 16 runs 👏 🇧🇩
Photo Credit: ICC/Getty#BCB #Cricket #BANvSCO #T20WorldCup pic.twitter.com/VydsFCRZYg
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 3, 2024
बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या स्कॉटलंड संघाला केवळ 103 धावाच करता आल्या. सलामीवीर सारा ब्राइसने संघासाठी दमदार कामगिरी केली. 52 चेंडूंचा सामना करताना तिने एका चौकारासह नाबाद 49 धावा केल्या पण ती संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. कर्णधार कॅथरीन ब्राइस अवघ्या 11 ,प्रियानाज चॅटर्जी 5 तर सलामीवीर हॉर्ले केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. अशाप्रकारे संपूर्ण संघ 20 षटकांत 7 विकेट गमावून केवळ 103 धावाच करू शकला.
बांगलादेशसाठी रितूची शानदार गोलंदाजी….
बांगलादेशकडून रितू मोनीने शानदार गोलंदाजी केली. तिने 4 षटकात 15 धावा देत 2 बळी घेतले. मारुफा अख्तर (3 षटकात 17 धावा), नाहिदा अख्तर (4 षटकात 19 धावा) आणि फहिमा खातून (4 षटकात 21 धावा) यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. राबेया खानलाही यश मिळाले.





