Women’s T20 World Cup 2024 : लंकेचा सलग दुसरा पराभव, ऑस्ट्रेलियानं 6 गडी राखून मिळवला विजय…

Women’s T20 World Cup 2024 (AUS vs SL) :- मेगन शुटच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंका संघाला 6 गडी राखून पराभूत करताना महिला टी -20 विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 93 धावा केल्या. यामध्ये निलाक्षीका सिल्वाने 29, हर्षिता समरविक्रमाने 23 तर अनुष्का संजीवनीने 16 धावांचे योगदान दिले. मेगन शुटने भेदक गोलंदाजी करताना श्रीलंका संघाचा डाव झटपट गुंडाळला. मेगन शुटने 3, सोफी मोलिनयुक्सने 2 तर ऍशले गार्डनर व जॉर्जिया वेअरहॅम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलिया संघाने 14.2 षटकांत 4 बाद 94 धावा करताना विजय साकारला. सलामीवीर बेथ मोनीने नाबाद 43 धावांची खेळी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार अलिसा हिली (4) व जॉर्जिया वेअरहॅम (3) झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. मात्र त्यानंतर बेथ मोनीने एलिस पेरी (17), ऍशले गार्डनर (12) व फोबी लेचफिल्ड (9) यांच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
Defending champions Australia begin their Women’s #T20WorldCup 2024 campaign with a win 👏#WhateverItTakes | #AUSvSL: https://t.co/mYILOBPwaC pic.twitter.com/qtUVN7blBO
— T20 World Cup (@T20WorldCup) October 5, 2024
दरम्यान, श्रीलंकेचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव ठरला. स्पर्धेत श्रीलंकेचा पहिला सामना पाकिस्तानविरूध्द झाला. पाकिस्तानने या सामन्यात श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे.
ग्रूप ए मध्ये गुणतालिकेत न्यूझीलंड एका सामन्यातील विजयासह पहिल्या तर आॅस्ट्रेलियाही एका सामन्यातील विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा रनरेट(+2.900) आस्ट्रेलियापेक्षा(+1.908) जास्त असल्यानं ते अव्वल स्थानी आहेत. तर श्रीलंका दोन सामन्यातील दोन पराभवासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.





