हलाखीचे जीवन जगणाऱ्या लावणी सम्राज्ञीच्या मदतीसाठी महिला आयोग सरसावले ! रुपाली चाकणकर यांनी दिले महत्वाचे आदेश

पुणे – एकेकाळची लावणी सम्राज्ञी.. जिच्या अदाकारीने लालबाग परळचे हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या आणि शिट्यांनी गाजले. जिच्या अदाकारीने आणि सौंदर्याने चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केले. ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागत आहे. बस स्थानकच तिचे घर झाले असून अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं या लावणी सम्राज्ञीचे नाव असून तिचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत शांताबाई यांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
शांताबाई यांचा बस स्थानकावरील व्हिडीओ व्हायरल होताच त्यांच्या या अवस्थेच्या बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या. आता महिला आयोगाने देखील याबाबतची दखल घेत स्थानिक प्रशासनाला काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
आपल्या ट्विटमध्ये चाकणकर म्हणतात,”तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे जि. म.बा. अहमदनगर यांना सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मान जनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देश आयोग देत आहे.”
तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 24, 2023
एकेकाळी याच शांताबाईच्या लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला. लालबाग परळचे हनुमान थिएटर गाजवले. त्यांची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून 40 वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा काढला. शांताबाई मालक झाल्या आणि पन्नास-साठ लोकांचे पोट भरू लागल्या. यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला. बक्कळ पैसा मिळू लागला. मालक आहोत या तोऱ्यात अशिक्षित शांताबाईची फसवणूक झाली. अत्तार भाईंनी सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाईंचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यांना मानसिक आजाराने ग्रासले. पती नाही, ना कुणी जवळचे नातेवाईक. कोपरगाव बसस्थानकच शांताबाईचे घर झाले होते.





