Womens Asia Cup 2024 (IND vs PAK) :- महिलांच्या आशियाई करंडक स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. आपल्या जेतेपदाचा बचाव करण्यसाठी स्पर्धेत उतरणाऱ्या महिला ब्रिगेड समोर पहिल्याच सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचे आव्हान असणार आहे. या हाय होल्टेज सामन्यात स्मृती मानधना आणि पाक कर्णधार निदा दारच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
गेल्या एका वर्षात भारतीय महिला क्रिकेट संघाने १७ टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी १० जिंकले आहेत. संघाला ५ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असून २ सामने अनिर्णित राहिले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने गेल्या वर्षभरात १९ टी-२० सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. भारतापेक्षा जास्त सामने खेळूनही पाकिस्तानच्या महिलांनी केवळ सात सामने जिंकले आहेत आणि १२ गमावले आहेत.
भारतीय आणि पाकिस्तानी महिला संघ १४ टी-२० सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. या १४ सामन्यांपैकी भारताने ११, तर पाकिस्तानने ३ जिंकले आहेत. त्यामुळे, या प्रतिस्पर्ध्यांमध्ये भारताचे वर्चस्व कायम आहे. महिला आशियाई करंडकात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ६ सामने झाले आहेत. ज्यापैकी भारताने ५ सामन्यांत सरशी मिळवली आहे तर २०२२ मध्ये पाकिस्तानने एकमेव सामना जिंकला होता. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध पाचपैकी चार विजय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत. २०१२ च्या स्पर्धेत मिताली राजने भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता.
मानधना जबरदस्त फॉर्मात
भारतासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे स्टार फलंदाज स्मृती मानधानाचा उत्कृष्ट फॉर्म आणि गोलंदाजांनी अलीकडे एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांत आठ विकेट घेतल्या तर फिरकीपटू राधा यादवलाही यश मिळाले आहे. फिरकीपटूंमध्ये दीप्ती शर्मा, सजीवन सजना आणि श्रेयांका पाटील यांचा समावेश आहे.
निदाकडे नेतृत्व; संघात अनेक बदल
आशियाई करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानने निदा दारला कर्णधारपदी कायम ठेवले असले तरी संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. इरम जावेद, ओमामा सोहेल आणि सय्यदा अरूब शाह यांना यावर्षी प्रथमच संघात स्थान मिळाले आहे, तर तस्मिया रुबाब पदार्पण करणार आहे.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे….
भारत : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर(कर्णधार), सजीवन सजना, दीप्ती शर्मा, श्रेयांका पाटील, उमा छेत्री, पूजा वस्त्राकर, राधा यादव, अरुंधती रेड्डी.
पाकिस्तान : सिद्रा अमीन, ओमामा सोहेल, इरम जावेद, निदा दार(कर्णधार), आलिया रियाझ, फातिमा सना, गुल फिरोजा, मुनिबा अली, डायना बेग, सादिया इक्बाल, नशरा संधू.