IND W vs SL W : भारताने सलग तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत मालिका घातली खिशात

India beat Sri Lanka in T20I Series : भारतीय महिला क्रिकेट संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ८ गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अजेय आघाडी घेऊन मालिका खिशात घातली आहे. रेणुका सिंह आणि दीप्ती शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीनंतर शेफाली वर्माच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.
शेफाली वर्माची दमदार फटकेबाजी –
श्रीलंकेने दिलेले ११३ धावांचे माफक आव्हान भारतीय संघाने अवघ्या १४ व्या षटकात पूर्ण केले. सलामीवीर शेफाली वर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत केवळ २४ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने ४२ चेंडूंत नाबाद ७९ धावांची खेळी केली, ज्यामध्ये ११ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. १८८ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करत तिने श्रीलंकेच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद २१ धावा करून तिला उत्तम साथ दिली. मात्र, स्टार फलंदाज स्मृती मानधना (१ धाव) आणि जेमिमा रॉड्रिग्स (९ धावा) स्वस्तात बाद झाल्या.
रेणुका-दीप्तीची फिरकी आणि वेग –
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांनी जखडून ठेवले. वेगवान गोलंदाज रेणुका सिंहने ४ षटकांत २१ धावा देऊन ४ बळी टिपले, तर फिरकीपटू दीप्ती शर्माने ४ षटकांत केवळ १८ धावा देत ३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या दोघांनी मिळून केवळ ३९ धावांत ७ बळी घेतल्यामुळे श्रीलंकेचा डाव ११२ धावांवर मर्यादित राहिला. या धक्क्यातून श्रीलंका संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही.
मालिका विजयाचा अनोखा योगायोग –
विशेष म्हणजे, या मालिकेतील तिन्ही सामने भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने ८ गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात ११.५ षटकांत ७ गडी राखून विजय मिळवला होता. आता तिसऱ्या सामन्यातही ८ गड्यांनी विजय मिळवत भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मालिकेतील चौथा सामना २८ डिसेंबरला आणि पाचवा व अंतिम सामना ३० डिसेंबरला तिरुवनंतपुरम येथेच खेळवला जाईल.





