Women T20 World Cup2024 : भारताच्या नकारानंतर ‘या’ देशात होऊ शकते टी-20 विश्वचषक स्पर्धा, ICCच्या निर्णयाची प्रतीक्षा…

ICC Women T20 World Cup2024 : पुरुषांचा टी-20 विश्वचषक यावर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून चॅम्पियन बनला होता. या विश्वचषकानंतर, ICC ची पुढील मोठी स्पर्धा महिला T20 विश्वचषक होती जी बांगलादेशमध्ये 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे, परंतु या देशातील ताजी राजकीय परिस्थिती आणि अस्थिरता लक्षात घेऊन आयसीसी हा मेगा इव्हेंट बांगलादेशऐवजी अन्य कोणत्या तरी देशात हलवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे.
आयसीसी भारताबरोबरच श्रीलंका आणि यूएईचा पर्याय म्हणून विचार करत आहे पण अंतिम निर्णय झालेला नाही. आयसीसीव्दारा महिला T20 विश्वचषक 2024 चे ठिकाण बदलल्याच्या बातम्यांदरम्यान, झिम्बाब्वेच्या वतीने स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनने हा मेगा इव्हेंट (कार्यक्रम) आयोजित करण्याचा प्रस्ताव आयसीसी(ICC) कडे दिला आहे.
झिम्बाब्वेने 2018 आणि 2023 मध्ये दोन एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीचे यशस्वी आयोजन केले आहे आणि एक सक्षम संघटक म्हणून स्वतःला सादर केले आहे. या आधारावर झिम्बाब्वेने आयसीसीकडे टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी केली आहे. आता 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातोय याची सर्वांना उत्सुकता आहे.
दरम्यान, झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिका आणि नामिबियासह 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे सह-आयोजक आहे. झिम्बाब्वेने शेवटच्या वेळी 2003 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. झिम्बाब्वेचे हरारे आणि बुलवायो येथे सुमारे 10,000 क्षमतेचे दोन स्टेडियम आहेत. झिम्बाब्वेचा महिला संघ टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरलेला नाही आणि हेच त्याच्या आयोजन प्रस्तावाच्या विरोधात जाऊ शकते.
भारताने फेटाळला प्रस्ताव…
बांगलादेशातील अस्थिरता दरम्यान, ICC ने BCCI ला महिला T20 विश्वचषक 2024 चे आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता परंतु बोर्ड सचिव जय शाह यांनी तो फेटाळला आहे. जय शाह यांनी पावसाळ्याचे कारण देत विश्वचषक आयोजित करण्यास नकार दिला आहे. दरम्यान BCCI ला 2025 मध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक आणि 2026 मध्ये पुरुषांचा T20 विश्वचषकाचे आयोजन करायचे आहे.





