IRE vs SL 1st ODI : श्रीलंकेच्या युवा खेळाडूने मोडित काढला स्मृती मंधानाचा मोठा विक्रम, ‘या’ बाबतीत टाकलं मागे….

Ireland Women vs Sri Lanka Women 1st Odi Match Result : श्रीलंकेचा महिला संघ सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना 16 ऑगस्ट रोजी बेलफास्टच्या मैदानावर खेळला गेला ज्यामध्ये श्रीलंकेच्या महिला संघाची युवा सलामीवीर फलंदाज विश्मी गुणरत्नेने या सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. मात्र, तिचे शतक संघाला विजयासाठी अपुरे ठरले.
असे असूनही विश्मीचे नाव निश्चितच एका खास यादीत समाविष्ट झाले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी ती आशियातील दुसरी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी सर्वात तरुण आशियाई खेळाडू होण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे, जिने 1999 मध्ये केवळ 16 वर्षे 205 दिवस इतके वय असताना आयर्लंड महिला संघाविरुद्ध शतक झळकावले होते. आता या यादीत विश्मीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे, जिने 18 वर्षे 360 दिवस इतके वय असताना वनडेमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. विश्मीने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकूण 98 चेंडूंचा सामना करत एकूण 101 धावा केल्या, ज्यामध्ये एकूण 9 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
वनडेमध्ये शतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण महिला खेळाडू…
(1) मिताली राज – वय : 16 वर्षे 205 दिवस (वि. आयर्लंड महिला संघ, 1999)
(2) विश्मी गुणरत्ने – वय : 18 वर्षे 360 दिवस (वि. आयर्लंड महिला संघ, 2024)
(3) स्मृती मानधना – वय : 19 वर्षे 202 दिवस (वि. ऑस्ट्रेलिया महिला संघ, 2016)
(4) दीप्ती शर्मा – वय : 19 वर्षे 264 दिवस (वि. आयर्लंड महिला संघ, 2017)
Vishmi Gunaratne blasts her maiden ODI century, becoming only the second Sri Lankan woman to achieve this feat! What an innings!🔥#IREvSL pic.twitter.com/eRrGNDNmr7
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 16, 2024
विश्मीच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद…
यासह आणखी एका विक्रमाची तिच्या नावावर नोंद झाली आहे. अठरा वर्षीय विश्मी गुणरत्नेनं तिच्या 16व्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार शतक झळकावलं. श्रीलंकेच्या महिला संघासाठी शतक झळकावणारी ती दुसरी महिला फलंदाज ठरली आहे . श्रीलंकेसाठी चमारी अटापट्टूनं एकूण 12 शतकं झळकावली आहेत आणि आता विश्मी गुणरत्नेचं शतक हे श्रीलंका महिला क्रिकेटमधील 13वे शतक होते. चमारी अटापट्टू व्यतिरिक्त श्रीलंकेसाठी अन्य कोणत्याही फलंदाजानं शतक झळकावलं नव्हतं, तर आता विश्मी गुणरत्ने अशी कामगिरी करणारी श्रीलंकेची दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे.
🔥 RESULT UPDATE 🔥
They’ve only gone and done it again!
Ireland beat Sri Lanka by 3 wickets in the first ODI at Stormont.
SCORE: https://t.co/GnwDOU9EN0
MATCH PROGRAMME: https://t.co/sumpTZoVCU#BackingGreen #FuelledByCerta ☘️🏏 pic.twitter.com/vh5rU5h6nN— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) August 16, 2024
विश्मी गुणारत्नेचं शतक व्यर्थ…
आयर्लंड महिला क्रिकेट संघाने पहिल्या आयसीसी चॅम्पियनशीप सामन्यात श्रीलंकेवर 3 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना विश्मी गुणरत्नेच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या महिला संघाने 50 षटकांत 8 गडी गमावून 260 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडने विजयासाठीचे 261 धावांचे हे आव्हान 4 चेंडू राखून आणि 7 गडी गमावून पूर्ण केलं.
आयर्लंडने 49.2 षटकांमध्ये 261 धावा केल्या आणि 3 विकेट्स राखून विजय मिळवला. ओरला प्रेंडरगास्ट हीने आयर्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या. प्रेंडरगास्ट हीने 107 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 122 धावा केल्या. आयर्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तसेच आयर्लंड महिला संघाचा श्रीलंकेविरुद्ध 50 षटकांच्या फॉरमॅटमधील हा पहिला विजय आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा रविवारी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.





