Satara News | महिला पोलिसांनी धरला चक्क फुगड्यांचा फेर

प्रभात वृत्तसेवा
सातारा – जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित पारंपरिक मंगळागौर- नागपंचमी कार्यक्रमात एरव्ही कर्तव्यपूर्तीच्या कामात मग्न असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क फुगड्यांचा फेर धरत मंगळागौरीच्या खेळांचा आनंद लुटला.पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या कल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या पत्नी भाग्यश्री दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक आश्लेषा हुले तसेच सर्व पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलिस अंमलदार, सोलापूरचे सखी मंडळ यांच्या महिला सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. अनेक प्रकारच्या फुगड्या, सूप, लाटणे, मुसळ यांसारख्या खेळांचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगले. गृहोपयोगी साहित्यासोबत मंगळागौरीचे खेळ उस्फूर्तपणे खेळण्यात आले. मंगळागौर- नागपंचमी या खेळातील आनंदासोबत शरीराला होणारा व्यायाम याचे महत्त्व सोलापूरच्या स्वरूप सखी मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला. यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती आश्लेषा हुले, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा काटकर, श्वेता पाटील, माधुरी देशमुख, मोना निकम , मुनीर मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.





