Women Maharashtra Kesari 2026 : सोरापुरात ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासह मिळणार ‘किया सोनेट’ कार; मानाच्या गदेसाठी ३५० महिला मल्लांमध्ये झुंज
Women Maharashtra Kesari 2026 : . २८ आणि २९ मार्च रोजी सोलापूरनगरीत चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम रंगणार आहे.

Women Maharashtra Kesari 2026 Solapur : स्व. सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ निर्झरा केअर फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथी वरिष्ठ गट महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २८ मार्चपासून सुरू होत आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठ परिसरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार असून, ४२ जिल्ह्यांतील ३५० हून अधिक महिला कुस्तीपटू यात सहभागी होणार आहेत.
बक्षिसांची लयलूट आणि तगडी स्पर्धा
यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी विजेतीला मानाची चांदीची गदा आणि ‘किया सोनेट’ (Kia Sonet) ही आलिशान कार देऊन गौरवण्यात येणार आहे. उपविजेत्या मल्लाला ‘बुलेट’ दुचाकी, तर प्रत्येक वजनी गटातील सुवर्णपदक विजेतीला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडच्या अनुपस्थितीत, अमृता पुजारी, अपेक्षा पाटील, सृष्टी भोसले आणि वाइल्ड कार्ड प्रवेश मिळालेली प्रतीक्षा बागडी यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळेल.
अत्याधुनिक व्यवस्था आणि वजन गट –
मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी ५० किलोपासून ७६ किलोपर्यंतचे विविध १० वजनी गट ठेवण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संचालिका स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी माहिती दिली की, खेळाडूंच्या निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या वडिलांचा, सिद्धाराम साखरे यांचा कुस्तीचा वारसा पुढे नेण्यासाठी स्वाती यांनी या भव्य स्पर्धेचे शिवधनुष्य पेलले आहे.
दिग्गजांची उपस्थिती –
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोलापूरची जनता या ऐतिहासिक महिला कुस्ती सोहळ्यासाठी प्रचंड उत्सुक आहे.





