Dahi Handi 2025 : शंकरराव भेलके महाविद्यालयात “पुस्तक हंडी”; वाचन संस्कृतीला नवे बळ
Gokulashtami Dahi Handi 2025 : गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे पुस्तक हंडी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. पारंपरिक सणासोबत वाचनाची आवड जोपासणे व पुस्तकांशी मैत्री करून ज्ञानसमृद्धी साधणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी पुस्तकहंडीस दिलेल्या सलामीने झाली. अंतिम टप्प्यात महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी हंडी फोडून महिलासक्षमीकरणाचा प्रभावी संदेश दिला. “पारंपरिक खेळांमध्ये मुलींचा सहभाग म्हणजे समानतेकडे वाटचाल करणारे सकारात्मक चित्र असून महिलांना प्रोत्साहन दिल्यास त्या निश्चितच अधिक मोठी भरारी घेतील,” असे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
विजयी संघाला स्पर्धा परीक्षा व अभ्यासपूरक पुस्तकांचे वाटप करून गौरविण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थिनी निकिता कोंढाळकर, निशा दीक्षित, पौर्णिमा गोळे, नेहा वाल्हेकर, तृप्ती सणस आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राचार्य डॉ. शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. याप्रसंगी डॉ. जगदीश शेवते, सहदेव रोडे, डॉ. रोहिदास ढाकणे, पौर्णिमा काराळे, भगवान गावित यांसह अनेक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
सणांच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचा प्रसार करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून महिलांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.





