लातूर: झाडाखाली थांबलेल्या आठ शेतमजुरांवर कोसळली वीज, दोघांचा मृत्यू, सहा जखमी

लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसाने नदी-नाले तुडुंब भरले असून, मांजरा, तेरणा, तावरजा आणि रेणा नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथे सोमवारी दुपारी पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या आठ शेतमजुरांवर वीज कोसळली.
यात विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने अहमदपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. अहमदपूरचे आमदार आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले. मोहोळ तालुक्यातील वटवटे येथे कामन्ना पाटील यांचे खरबूज पीक कीड लागून वाया गेले, तसेच कांदा आणि आंबा पिकांचेही नुकसान झाले. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे आणि भरपाईची मागणी केली आहे. पुढील २४ तास सोलापूरात मुसळधार पावसाचा इशारा आहे.
बारामती आणि इंदापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे कॅनल फुटल्याने शेतीचे नुकसान झाले. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. “शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. नुकसान मोठे असून, तोडगा काढण्याचा प्रयत्न करू,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.





