पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरमध्ये महिलेचा मृतदेह, पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे : पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली. ही महिला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणारी होती. कौशल्या मुकेश चव्हाण (रा. जेएसपीएम महाविद्यालयाजवळ, उंड्री) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सकाळी कोंढवा येथून एक टँकर पाणी भरण्यासाठी हांडेवाडी येथील पॉवर हाऊसला आला होता. टँकरमध्ये पाणी भरताना मध्येच ते अडले गेले. यामुळे टँकर चालकाने खाली उतरुण बघितले तर त्याला महिलेचा मृतदेह दिसला. यानंतर टँकरचालकाला मोठा बसला, त्याने तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात खबर दिली. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकर कोंढव्यावरुन आल्याने कोंढवा पोलिसांनी खबर दिली. कोंढवा पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.
पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी माहिती दिली की, महिला पती आणि दोन मुलांसह उंड्री येथे राहते. हे कुटूंब मुळचे उत्तर प्रदेशातील आहे. ते एक महिन्यापुर्वीच पुण्यात आले होते. तिचा पती फरशी बसवण्याचे काम करतो. तर ती समोरच्या एका इमारतीत कामाला जाते. तिला थोडा मानसिक आजार आहे. यावर त्यांनी गावाकडे स्थानिक वैद्य व पुजाऱ्यांकडून उपचार करुन घेतले होते.
दरम्यान, आज सकाळी ही महिला कामाला जाते म्हणून समोरच्या इमारतीत गेली होती. टँकर चालकही तेथेच रहातो, तसेच त्याचा टँकरही तेथेच असतो. ती टँकरमध्ये पडली की उडी मारली हे मात्र सांगता येणार नाही. मात्र तिच्या अंगावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नाहीत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.





