युपीएससी परीक्षेतील यशाबद्दल ‘या’ तरुणीचा झाला मोठा सत्कार; निकाल पाहिल्यानंतर कुटुंबाने मागितली माफी

रामगढ: ऐकलेल्या गोष्टींवर तेव्हाच विश्वास ठेवावा जोपर्यंत तुम्ही ते स्वतः पाहत नाही. पण अनेकदा लोक अशा चुका करतात आणि नंतर लाजिरवाण्या प्रसंगाला समोरं जावं लागतं. झारखंडची रहिवासी असलेल्या २४ वर्षीय दिव्यासोबत असेच घडले.
दिव्या पांडे हिने यूपीएससी परीक्षेत यशाचा दावा केला होता. मात्र, आता दिव्या पांडेने नाही, तर दक्षिण भारतातील दिव्या पी. हिने ही परीक्षा ३२३व्या रँकसह उत्तीर्ण केली आहे. मात्र दिव्या पांडेच्या घरच्यांनी आपल्याच मुलीचं यश समजून आनंदोत्सव साजरा केला.
दिव्या पांडेच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की त्यांच्या मुलीने पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र आता त्यांनी जिल्हा प्रशासन आणि सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडची (सीसीएल) माफी मागितली. जिल्हा प्रशासन आणि सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड या दोन्हीच्या वतीने दिव्याचा मोठा सन्मान कऱण्यात आला होता.
शिवाय प्रसारमाध्यमांनी देखील दिव्या पांडेच्या यशाच्या बातम्यांना प्राधान्याने प्रसिद्ध केल्या होत्या. आता दिव्याच्या कुटुंबियांनी चुकीची माहिती दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून नकळत चूक झाल्याचं मान्य केलं आहे.
दिव्या पांडे (२४) च्या वतीने माफी मागताना तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तसेच तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, युपीएससी परीक्षेत यश मिळवणारी दिव्या पांडे नसून दक्षिण भारतातील दिव्या पी. आहे. दिव्या पी. हिनेच परीक्षेत ३२३ वा क्रमांक मिळवला.
दिव्या पांडेची मोठी बहीण प्रियदर्शनी पांडेने सांगितले की, दिव्याला उत्तर प्रदेशात राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीने माहिती दिली की तू यूपीएससीमध्ये ३२३ वा क्रमांक मिळवला आहे. यानंतर त्यांनी यूपीएससीच्या वेबसाइटवर निकाल पाहण्याचा प्रयत्न केला. पण इंटरनेट काम करत नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतः निकाल पाहिला नाही आणि मैत्रीणीच्या शब्दांवर विश्वास ठेवून उत्तीर्ण झाल्याची घोषणा केली. ही नकळत चूक झाली.





