Pune District : डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
Pune District : मिळालेल्या माहितीनुसार, डंपर सोलापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने एक दुचाकीस्वार महिलेला सोबत घेऊन प्रवास करत होता. इरिगेशन कॉलनी चौकात दुचाकीस्वाराला रस्ता ओलांडायचा असताना क्लीनर बाजूने दुचाकी आल्याचे डंपरचालकाच्या निदर्शनास आले नाही.

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील इरिगेशन कॉलनी चौकात भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. डंपरच्या चाकाखाली महिला चिरडली गेल्याने घटनास्थळी मृत्यूचा थरार उडाला. शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव गीता सुदामा वर्मा (रा. सध्या उरुळी कांचन, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे आहे. तर जखमी तरुणाचे नाव सुदामा वर्मा आहे. गीता वर्मा या उरुळी कांचन येथील विजय ट्रेडर्स येथे कामाला असल्याची माहिती मिळली आहे. पती सुदामा वर्मा हे त्यांना कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर सोलापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने एक दुचाकीस्वार महिलेला सोबत घेऊन प्रवास करत होता. इरिगेशन कॉलनी चौकात दुचाकीस्वाराला रस्ता ओलांडायचा असताना क्लीनर बाजूने दुचाकी आल्याचे डंपरचालकाच्या निदर्शनास आले नाही. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही डंपरच्या विळख्यात सापडले. डंपरचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जीवन-मरणाच्या संघर्षात अडकला आहे.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे माऊली लाड, रतन चव्हाण, संतोष झोंबाडे तसेच कस्तुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना बाहेर काढून जखमीला तातडीने उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार रमेश भोसले, अमोल खांडेकर आणि हवालदार भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताप्रकरणी पुढील पोलीस कार्यवाही सुरू आहे.
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या चौकात झालेल्या या भीषण अपघाताने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.





