Rajgurunagar : भीमाशंकरवाडीत २९ घरांच्या बोगस नोंदींचा धक्कादायक प्रकार उघड
Rajgurunagar : विशेष म्हणजे, या कथित मासिक सभेच्या इतिवृत्तात अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक उपस्थित असल्याचेही नमूद करण्यात आले असून, सदस्यांच्या सह्या दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राजगुरुनगर : तीर्थक्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंदिर परिसरातील भीमाशंकरवाडीचे एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय जाहीर केला असतानाच, भोरगिरी संयुक्त ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भीमाशंकरवाडीत तब्बल २९ घरांच्या बोगस नोंदी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये सरपंच दत्तात्रय हिले आणि तत्कालीन ग्रामसेवक ज्ञानेश्वर पावडे यांनी ग्रामपंचायतीच्या दफ्तरी या नोंदी केल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. या प्रकारामुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी विठ्ठल वनघरे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या दप्तरासह तक्रार दाखल केली. ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक आठमध्ये २९ मालमत्तांच्या नोंदी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वनघरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भीमाशंकरवाडीतील तसेच पदरवाडीतील कुटुंबांचे स्वतंत्र जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली होती. याच पार्श्वभूमीवर सप्टेंबर २०२५ मधील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे कथित बोगस इतिवृत्त तयार करून भोरगिरी, भीमाशंकरवाडी आणि पदरवाडीतील स्थानिक रहिवाशांच्या घरांच्या नोंदी करण्याऐवजी खेड तालुक्यातील विविध गावांतील २९ व्यक्तींच्या घरांच्या नोंदी भीमाशंकरवाडीत दाखविण्यात आल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, या कथित मासिक सभेच्या इतिवृत्तात अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक उपस्थित असल्याचेही नमूद करण्यात आले असून, सदस्यांच्या सह्या दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित २९ व्यक्तींची घरे प्रत्यक्षात भीमाशंकरवाडीत नसताना खासगी जागांवर मालमत्ता दाखवून ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदी करण्यात आल्याने शासनाची आणि ग्रामपंचायतीची फसवणूक झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
याप्रकरणी खेड पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. यावेळी सरपंच दत्तात्रय हिले, तत्कालीन व सेवानिवृत्त ग्रामसेवक ज्ञानेश्वर पावडे, ग्रामपंचायत सदस्य सीता वनघरे, सुनीता काठे, माधुरी काठे यांच्यासह विठ्ठल वनघरे, संतोष काठे, सुरेश काठे, लक्ष्मण काठे, वसंत काठे, शांताराम सोनवणे, शंकर लांघी, चंद्रकांत कौदरे, दत्ता कौदरे आणि संतोष कानसकर उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान सरपंच दत्तात्रय हिले यांनी आपली बाजू मांडताना संबंधित २९ जणांनी वीजजोडणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडे लेखी मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. मात्र, आता या नोंदी रद्द करण्यास आपली हरकत नसल्याचे सांगितल्याची माहिती आहे.
मात्र, संबंधित २९ व्यक्तींची भीमाशंकरवाडीत घरेच नसताना त्यांनी वीजजोडणीसाठी अर्ज कोणत्या जागेच्या आधारे केले? प्रत्यक्ष घर नसताना ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक आठमध्ये मालमत्तेच्या नोंदी कशा करण्यात आल्या? तसेच मासिक सभेचे इतिवृत्त आणि उपस्थितीच्या सह्या खऱ्या आहेत का? असे गंभीर प्रश्न विठ्ठल वनघरे यांनी उपस्थित केले आहेत.
प्रक्रियेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, कथित बोगस नोंदींचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात संबंधित २९ जणांचे घरनोंदणीचे अर्ज ग्रामपंचायतीकडे घेण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंदोलनाचा इशारा
पुनर्वसनाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरच अशा प्रकारे २९ घरांच्या नोंदी करण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे आणि ग्रामस्थांनी दिला आहे.





