Alephata : भाव मिळाला, पण पदरात उत्पादनच कमी!
Alephata : बेल्हे-जेजुरी महामार्गावर साकोरीफाटा परिसरातील कापूस खरेदी केंद्रावर सध्या कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. गेल्या वर्षी हाच दर साधारण सात हजार रुपयांच्या आसपास होता.

आळेफाटा : बाजारात कापसाला चांगला भाव मिळत असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचे हसू दिसत नाही. कारण, यंदा भावाने साथ दिली, पण निसर्गाने हात आखडता घेतल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला झळाळी मिळूनही जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित उत्पन्न पडत नसल्याचे चित्र आहे.
बेल्हे-जेजुरी महामार्गावर साकोरीफाटा परिसरातील कापूस खरेदी केंद्रावर सध्या कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. गेल्या वर्षी हाच दर साधारण सात हजार रुपयांच्या आसपास होता. त्यामुळे यंदा बाजारभावाच्या दृष्टीने कापूस उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रत्यक्ष उत्पादनात घट झाल्याने या वाढलेल्या दराचा फायदा अपेक्षेइतका मिळत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील साकोरी, मंगरूळ, झापवाडी यांसह परिसरातील अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून उसाऐवजी कापूस लागवडीला प्राधान्य देत आहेत. कमी कालावधीत आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. मात्र, यंदा पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने कापसाच्या पिकाला अपेक्षित पाणी मिळाले नाही. परिणामी, बोंडांची वाढ आणि उत्पादनावर परिणाम झाला.
सध्या सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असताना कापसाला मात्र चांगला बाजारभाव मिळत आहे. परंतु, शेतीचे अर्थकारण केवळ बाजारभावावर ठरत नाही, तर एकरी उत्पादन किती मिळाले यावरही अवलंबून असते, याचा प्रत्यय यंदाच्या कापूस हंगामातून येत आहे.
एकीकडे वाढलेला बाजारभाव दिलासा देत असला, तरी दुसरीकडे कमी उत्पादन, लागवड खर्च आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्याचे गणित बिघडले आहे. त्यामुळे ‘पांढरे सोने’भावाच्या बाबतीत चमकत असले, तरी उत्पादनाच्या आघाडीवर शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे चित्र बेल्हे परिसरात पाहायला मिळत आहे.
यंदा कापसाला समाधानकारक बाजारभाव मिळत असला, तरी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दर चांगला मिळूनही शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक फायदा होत नाही.
-महादूनाना खराडे, कापूस उत्पादक शेतकरी.





