Pune District : दहा महिन्यांत साकारली सातारकावस्तीच्या शाळेची वास्तू
Pune District : १९७१ मध्ये सुरू झालेल्या सातारकावस्ती शाळेने शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यासह राज्यात आपला वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या शाळेने गुणवत्तेच्या जोरावर यशाची अनेक शिखरे गाठली आहेत.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील रेटवडी येथील सातारकावस्तीच्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली भव्य आणि सुसज्ज इमारत अवघ्या दहा महिन्यांत पूर्ण झाली आहे. मर्सिडीज-बेंझ फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. आणि हँड इन हँड इंडिया यांच्या माध्यमातून सीएसआर निधीतून साकारलेल्या या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २७) उत्साहात पार पडला. या नव्या वास्तूमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
१९७१ मध्ये सुरू झालेल्या सातारकावस्ती शाळेने शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यासह राज्यात आपला वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या शाळेने गुणवत्तेच्या जोरावर यशाची अनेक शिखरे गाठली आहेत. २०२० मध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेसाठी तीन एकर गायरान जागा उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी स्वर्गीय सुभाष हिंगे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विशेष पुढाकार घेतला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवीन इमारतीचे भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या दहा महिन्यांत ही भव्य वास्तू उभी राहिली आहे.
शाळेच्या परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच इतर प्रलंबित विकासकामे आमदार, खासदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या लोकार्पण सोहळ्यास मर्सिडीज बेंझ फायनान्शियल सर्विसेस इंडिया, प्रा. लिमिटेडचे अनिता अय्यर, प्रकाश नहाता, फ्रान्सिस केनडी, मुथूस्वामी के, जिल्हा परिषद सभापती तथा गटनेते अॅड. विजयसिंह शिंदे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, पंचायत समिती सभापती गौरी मुऱ्हे, उपसभापती दिलीप डुबे, सरपंच निर्मला हिंगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, माजी उपसभापती सतीश राक्षे, विस्ताराधिकारी नंदा चासकर, केंद्रप्रमुख मंगेश शेंडे, मुख्याध्यापक सोपान मांजरे, हँड टू हॅण्डचे प्रकाश नाथ, राधाकृष्णन कोंडा, द्वारकानाथ टिजगे, किरण पवार, अतुल थिटे, आनंदराव काळे, दिलीप पवळे, सुनील वाबळे, विलास पवार, लहाणू पवार, राजू हिंगे, शंकर पवार, मंगेश पवार, तुषार वाटेकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तुषार वाटेकर यांनी केले. आभार पंचायत समिती उपसभापती दिलीप डुबे यांनी मानले.
औद्योगिक कंपन्यांच्या सीएसआर निधीचा शैक्षणिक विकासासाठी योग्य वापर झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊ शकतात, याचे सातारकावस्ती शाळा हे उत्तम उदाहरण आहे.
-बाबाजी काळे, आमदार





