Eknath Shinde : राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत समाधानकारक कामगिरी न केलेल्या मंत्र्यांची खुर्ची धोक्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा (रिपोर्ट कार्ड) घेतला जात आहे. ज्यांची कामगिरी कमकुवत आहे किंवा ज्यांनी आपल्या जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. अशा नेत्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देऊन त्यांना मंत्रिपदातून मुक्त करण्याचा विचार सुरू असल्याचेही समजते. नव्या आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी? या फेरबदलात नव्या आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळू शकते, तर आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात मजबूत पकड असलेल्या आमदारांनाही पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडू शकते. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सत्तेचा फायदा पोहोचवण्यासाठी आणि प्रशासनात गती आणण्यासाठी हा फेरबदल आवश्यक असल्याचे मानले जात आहे. eknath shinde दरम्यान, काही खात्यांमध्ये कामाचा वेग मंदावल्याबाबत तक्रारी येत आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर वरिष्ठ नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच, वादात अडकलेले किंवा स्थानिक पातळीवर नाराजी निर्माण करणारे मंत्रीही बदलाच्या यादीत असू शकतात. या संभाव्य फेरबदलामुळे महायुतीतील इच्छुक आमदारांमध्ये उत्सुकता वाढली असून विद्यमान मंत्र्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. दिवाळीपूर्वी होणारा हा बदल राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar: “…म्हणे हे लाडक्या बहिणींचे भाऊ”; दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरवल्याने ठाकरे गटाच्या नेत्याची सरकारवर टीका