Wimbledon Open 2024 : सामना ‘न’ खेळताच नोव्हाक जोकोविचची थेट उपांत्य फेरीत धडक, जाणून घ्या कारण…

Wimbledon Open 2024 (Alex de Minaur vs Novak Djokovic,Quarter-final Match) : सर्बियाचा स्टार माजी जागतिक नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचने विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ॲलेक्स डी मिनौर बुधवारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हिपच्या (खुबा) दुखापतीमुळे खेळला नाही आणि त्याने सामन्यातून माघार घेतल्याने जोकोविचने न खेळता विम्बल्डन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या नवव्या मानांकित ॲलेक्स डी मिनौरने सेंटर कोर्टवर जोकोविचविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या काही तास आधी स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली. डी मिनौर पत्रकार परिषदेत म्हणाला, “अर्थात ही जी घोषणा आहे ती मला करायची नव्हती, पण नाईलाजाने करावी लागतेय. ”
या वॉकओव्हरसह, जोकोविचने 13व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि अशा प्रकारे पुरुष एकेरीत रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली. द्वितीय मानांकित जोकोविचने पुरुष एकेरीत विक्रमी 24 ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावली आहेत. त्यापैकी सात हे विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद आहेत. आता अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी जोकोविचचा सामना शुक्रवारी (12 जुलै) टेलर फ्रिट्झ आणि लोरेन्झो मुसेट्टी यांच्यातील विजेत्याशी होईल.
दरम्यान, जोकोविचने रुआनेचा 6-3, 6-4, 6-2 असा पराभव करून तर ॲलेक्स डी मिनौर याने फ्रान्सच्या आर्थर फिल्सचा 6-2, 6-4, 4-6, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.





