Djokovic Wimbledon Thriller : विम्बल्डनमध्ये जोकोविचची दमछाक! ३ तास चाललेल्या थरारात आर्थर रिंडरनेचला नमवून कसाबसा गाठला चौथा राउंड
Djokovic Wimbledon Thriller : ३ तास १ मिनिट चाललेल्या या मॅरेथॉन सामन्यात जोकोविचने चार सेटच्या लढतीनंतर आर्थरचे कडवे आव्हान ७-५, ६-४, १-६, ७-६ (७-३) असे परतवून लावत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

Novak Djokovic vs Arthur Rinderknech Wimbledon 2026 : ऑल इंग्लंड क्लबवर सुरू असलेल्या प्रतिष्ठित विम्बल्डन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी कमालीचे थरारक सामने पाहायला मिळाले. आपल्या २५ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्बियाच्या महान नोव्हाक जोकोविच याला तिसऱ्या फेरीचा अडथळा पार करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागला. सातव्या मानांकित जोकोविचला २५ व्या मानांकित फ्रान्सच्या आर्थर रिंडरनेच याने कोर्टवर जोरदार झुंजवले. अखेर ३ तास १ मिनिट चाललेल्या या मॅरेथॉन सामन्यात जोकोविचने चार सेटच्या लढतीनंतर आर्थरचे कडवे आव्हान ७-५, ६-४, १-६, ७-६ (७-३) असे परतवून लावत चौथ्या फेरीत प्रवेश केला.
आर्थरने जोकोविचला एका सेटमध्ये पाजले पाणी –
सामन्याची सुरुवात जोकोविचने अपेक्षेप्रमाणे केली. त्याने पहिला सेट ७-५ आणि दुसरा सेट ६-४ असा जिंकत सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये २५ वर्षीय आर्थर रिंडरनेचने अनपेक्षित पलटवार केला. त्याने जोकोविचला कोणतीही संधी न देता हा सेट ६-१ असा खिशात घातला आणि खळबळ उडवली. चौथ्या सेटमध्येही दोघांमध्ये काँटे की टक्कर झाली, परंतु जोकोविचने अनुभवाच्या जोरावर टायब्रेकमध्ये ७-६ (७-३) अशी बाजी मारत विजय निश्चित केला.
Novak Djokovic diving volley on match point! 😱 pic.twitter.com/HftVyv0pFd
— Wimbledon (@Wimbledon) July 3, 2026
अव्वल मानांकित यानिक सिनर सुसाट, ओसाकाचाही जलवा –
दुसरीकडे, जगातील अव्वल मानांकित टेनिसपटू यानिक सिनर (Jannik Sinner) याला मात्र विजयासाठी फारशी मेहनत करावी लागली नाही. त्याने जेन्सन ब्रुक्सबाय याच्यावर २ तास १४ मिनिटांत ६-४, ६-३, ६-४ अशी सरळ तीन सेटमध्ये मात करत पुढचे पाऊल टाकले.
तसेच, आठव्या मानांकित डॅनिल मेदवेदेव यानेही जे. स्ट्रफला सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. महिला एकेरीमध्ये जपानच्या १४ व्या मानांकित नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिने आपला आक्रमक फॉर्म कायम ठेवत डी. कसातकिना हिचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला.





