Wimbledon Open 2024 : स्पेनच्या अल्काराझने रचला इतिहास, जोकोविचला हरवून सलग दुसऱ्यांदा पटकावले विम्बल्डनचे जेतेपद…

Carlos Alcaraz Wins Wimbledon Final 2024 : स्पेनच्या कार्लोस अल्काराजने विम्बल्डन 2024 च्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचचा पराभव करून दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. अल्काराझने जोकोविचचा 6-2, 6-2, 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे.
24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता जोकोविच गेल्या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत अल्काराजकडून पराभूत झाला होता. 36 वर्षीय सर्बियन स्टारकडे मागील पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही आणि अल्काराझने यंदाही बाजी मारत इतिहास रचला.
To win here is special. To defend here is elite.
Carlos Alcaraz is the 2024 Gentlemen’s Singles Champion 🏆#Wimbledon pic.twitter.com/kJedyXf0vn
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2024
स्पेनच्या कार्लोस अल्काराझने 2024 च्या फायनलमध्ये जोकोविचविरुद्ध पहिले दोन सेट सहज जिंकले होते. त्याने पहिले दोन सेट 6-2, 6-2 असे जिंकले, मात्र तिसऱ्या सेटसाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत गेला, ज्यात 21 वर्षीय कार्लोसने बाजी मारत कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.
अल्काराज आणि जोकोविच यांच्यातील हा सामना 2 तास 27 मिनिटे चालला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पेनच्या खेळाडूनं वर्चस्व राखले. पहिले दोन सेट त्याने जिंकले. यानंतर जोकोविचने तिसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले, पण त्याला सामना जिंकता आला नाही. अंतिम सामन्याचा तिसरा सेट खूपच रोमांचक झाला. अल्काराझ 5-4 ने आघाडीवर होता. तेव्हा जोकोविचने जोरदार पुनरागमन करत 6-6 अशी बरोबरीत साधत सेट टायब्रेकरमध्ये नेला. मात्र, येथेही पुन्हा एकदा अल्काराझने बाजी मारली आणि त्याने तिसरा सेट 7-6 असा जिंकून विजेतेपद पटकावले.
कार्लोसने केली रॉजर फेडररची बरोबरी…
कार्लोस अल्काराझने चौथे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावून महान टेनिसपटू रॉजर फेडररची बरोबरी केली आहे. फेडररनंतर कार्लोस अल्काराझ हा आपल्या कारकिर्दीतील पहिले चार ग्रँड स्लॅम अंतिम सामने जिंकणारा पहिला टेनिसपटू ठरला आहे. कार्लोसने आतापर्यंत दोनदा विम्बल्डन, एकदा फ्रेंच ओपन आणि एकदा यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली आहे आणि चारही वेळा बाजी मारत विजेतेपद पटकावले आहे.
जोकोविच इतिहास रचण्यास मुकला…
सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीत 24 वेळा ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. जोकोविच त्याच्या कारकिर्दीतील 10 वी विम्बल्डन फायनल खेळत होता आणि त्याआधी त्याने 7 वेळा हे विजेतेपद पटकावले होते. स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा पराभव करण्यात तो यशस्वी ठरला असता तर सर्वाधिक वेळा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याच्या बाबतीत त्याने रॉजर फेडररची बरोबरी केली असती. फेडरर याने एकूण आठ वेळा विम्बल्डन ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले आहे.





