IND vs ZIM 5th T20 Match Result : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेवर कब्जा केला आहे. भारताने ही मालिका 4-1 अशी जिंकली आहे. याआधी भारतीय संघाने दुसरा (100 धावा), तिसरा (23 धावा) आणि चौथा (10 विकेट) टी-20 सामना जिंकला होता. तर पहिला सामना झिम्बाब्वेने 13 धावांनी जिंकला होता.
हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे रविवारी खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 167 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला 18.3 षटकांत 10 गडी गमावून केवळ 125 धावा करता आल्या. या सामन्यात शिवम दुबेला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने 26 धावा केल्या आणि दोन विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. त्याने एकूण 28 धावा केल्या आणि आठ विकेट घेतल्या.
For his all-round impact in the 5th T20I, Shivam Dube wins the Player of the Match award 🏆👏
Scorecard ▶️ https://t.co/TZH0TNJcBQ#TeamIndia | #ZIMvIND | @IamShivamDube pic.twitter.com/yxO8KifBK5
— BCCI (@BCCI) July 14, 2024
विजयासाठी 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही. मुकेश कुमारने संघाला पहिला धक्का दिला. धावसंख्या एक असताना त्याने माधवरेला बोल्ड केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मुकेशने ब्रायन बेनेटवर निशाणा साधला आणि त्याला शिवम दुबेकडे झेलबाद केले. त्याला केवळ 10 धावा करता आल्या. यानंतर मारुमणी आणि माईर्स यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी झाली जी नवव्या षटकात सुंदरने मोडली. त्याने मारुमणीला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो 27 धावा करून बाद झाला तर मायर्स 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात सिकंदर रझाने आठ धावा, कॅम्पबेलने चार धावा, मदंडेने एक धाव, मावुताने चार धावा केल्या.
भारताविरुद्ध या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या फराज अक्रमने चमकदार कामगिरी केली. त्याने 13 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. मुकेश कुमारने 19 व्या षटकात अक्रमला आपला बळी बनवले. तर रिचर्ड नागरवाने शून्य आणि मुझाराबानीने एक धाव (नाबाद) केली. मुकेशने रिचर्डला बाद करून झिम्बाब्वेचा डाव संपवला. भारताकडून मुकेश कुमारने एकूण चार विकेट घेतल्या. त्याने माधवरे, बेनेट, अक्रम आणि नगारावा यांना बाद केले. याशिवाय शिवम दुबेने 2 तर तुषार, सुंदर आणि अभिषेकने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, पाचव्या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा याने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पाचव्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 20 षटकात 6 बाद 167 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली होती. डावाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालने 13 धावा केल्या. वास्तविक, सिकंदर रझाने पहिला चेंडू नो टाकला होता ज्यावर जयस्वालने षटकार मारला होता. यानंतर फ्री हिटचा फायदा घेत त्याने आणखी एक षटकार मारला. मात्र, या षटकातील चौथ्या चेंडूवर रझाने त्याला क्लिनबोल्ड करत बाद केले. यानंतर अभिषेक शर्मा फलंदाजीला आला त्याला केवळ 14 धावा करता आल्या. कॅप्टन गिलची बॅटही आज शांत राहिली. त्याला केवळ 13 धावा करता आल्या.
Innings Break!#TeamIndia posted 167/6 on the board!
5⃣8⃣ for vice-captain @IamSanjuSamson
Some handy contributions from @IamShivamDube & @ParagRiyanOver to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/TZH0TNJcBQ#ZIMvIND pic.twitter.com/p5OEEx8z2a
— BCCI (@BCCI) July 14, 2024
पॉवरप्लेमध्ये भारताने तीन विकेट गमावल्या. यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी पदभार स्वीकारला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 65 धावांची भागीदारी झाली. मावुताने पंधराव्या षटकात परागला आपला बळी बनवले. 22 धावा करून तो बाद झाला. तर संजू सॅमसन 45 चेंडूत 58 धावांची तुफानी खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 39 चेंडूत आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्या खेळीदरम्यान एक चौकार आणि चार षटकार मारले.
18व्या षटकात सॅमसन बाद झाल्यानंतर संथ धावगतीमुळे एके काळी टीम इंडियाला दीडशे धावसंख्याही गाठता येणार नाही असे वाटत होते. शेवटच्या 2 षटकांमध्ये शिवम दुबे आणि रिंकू सिंगने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 167 धावांपर्यंत नेली. 19व्या षटकात शिवम दुबेने 2 षटकार आणि 1 चौकार मारून एकूण 19 धावा काढल्या. दुबेने 12 चेंडूत 26 धावा तर रिंकू सिंगने 9 चेंडूत 15 धावांची छोटीशी खेळी केली. झिम्बाब्वेकडून मुझाराबानीने दोन तर रझा, रिचर्ड आणि मावुथा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.