Wimbledon 2025 : नोव्हॉक जोकोविचचा ऐतिहासिक पराक्रम, विम्बल्डनमध्ये १०० सामने जिंकणारा ठरला तिसरा खेळाडू!

Wimbledon 2025 Updates : विम्बल्डनच्या 138 व्या हंगामात नोव्हाक जोकोविचने एक खास पराक्रम केला आहे. जोकोविच हा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात 100 सामने जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने तिसऱ्या फेरीत आपला सर्बियन सहकारी मिओमिर केकमानोविच याच्यावर 6-3, 6-0, 6-4 असा विजय मिळवत हा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी मार्टिना नवरातिलोवा आणि रॉजर फेडरर यांनी हा टप्पा गाठला होता.
जोकोविचने आपल्या 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदांपैकी सात विजेतेपदे ऑल इंग्लंड क्लब येथे जिंकली आहेत. शनिवारी सेंटर कोर्टवर केकमानोविचविरुद्ध खेळताना त्याने पहिल्या सेटमध्ये 3-3 अशा बरोबरीनंतर सलग नऊ गेम जिंकत पुढील फेरीत सहज प्रवेश केला. आपली 20वी विम्बल्डन स्पर्धा खेळणाऱ्या 38 वर्षीय जोकोविचचा पुढील सामना 11व्या मानांकित अॅलेक्स डी मिनौर याच्याशी होईल. महिला गटात नवरातिलोवाने 120 एकल सामने जिंकले, तर पुरुष गटात आठ वेळा चॅम्पियन ठरलेल्या फेडररने 105 एकल सामने जिंकले आहेत.
युकी भांबरी एकमेव भारतीय खेळाडू स्पर्धेत कायम –
Milestone met. The journey continues…
Novak Djokovic has become just the 3rd player to record 100 match-wins at Wimbledon, after 9-time champion Martina Navratilova and 8-time champion Roger Federer 🌱#Wimbledon pic.twitter.com/5pEXE0pE4t
— Wimbledon (@Wimbledon) July 5, 2025
विम्बल्डनमध्ये युकी भांबरी हा एकमेव भारतीय खेळाडू स्पर्धेत कायम आहे. त्याने शनिवारी आपला अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोवे याच्यासह पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. 16व्या मानांकित भांबरी-गॅलोवे जोडीने पोर्तुगालच्या नूनो बोर्गेस आणि मार्कोस गिरोन यांना दीड तासात 6-3, 7-6 (8-6) असे पराभूत केले. आता त्यांचा सामना उप-उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या मार्सेलो ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासियो जेबेलोस यांच्याशी होईल.
हेही वाचा – IND vs ENG : एक-दोन नव्हे, ३ विश्वविक्रम; शुबमन गिलच्या आधी जगात कोणीही केला नव्हता ‘असा’ धमाका
इतर भारतीय खेळाडूंचा पराभव –
दुसरीकडे, इतर भारतीय खेळाडूंसाठी निकाल अनुकूल राहिले नाहीत. एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोलिपल्ली हे आपापल्या जोडीदारांसह स्पर्धेतून बाहेर पडले. बालाजी आणि त्याचा मॅक्सिकन जोडीदार मिगुएल रेयेस-वरेला यांनी पहिल्या कोर्टवर चौथ्या मानांकित ग्रॅनोलर्स-जेबेलोस जोडीविरुद्ध चांगली लढत दिली, पण दुसऱ्या फेरीत एक तास व 20 मिनिटांत 4-6, 4-6 अशी हार पत्करावी लागली.
हेही वाचा – IND vs ENG : कर्णधार गिलच्या चुकीमुळे बीसीसीआय अडचणीत? २५० कोटींच्या करारावर टांगती तलवार
बोलिपल्ली आणि त्यांचा कोलंबियन जोडीदार निकोलस बॅरिएंटोस यांनीही सहाव्या मानांकित ब्रिटिश जोडी जो सॅलिसबरी आणि नील स्कूप्स्की यांच्याविरुद्ध कडवी झुंज दिली, पण दुसऱ्या फेरीत एक तास 47 मिनिटांत 4-6, 6-7 (9) असे पराभूत झाले. रोहन बोपण्णा यापूर्वीच पहिल्या फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, मुलांच्या एकल गटात कृष त्यागी याला चेक प्रजासत्ताकच्या जान कुम्स्टॅट याच्याकडून 3-6, 3-6 अशा पराभवाला सामोरे जावे लागले आणि तोही पहिल्या फेरीत बाहेर पडला.





