Wimbledon Open 2024 : गतविजेती वोंद्रोसोवा झाली उलटफेरची शिकार, पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की…

Wimbledon Open 2024 : विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाहेर पडणारी मार्केटा वोंद्रोसोवा 1994 नंतरची पहिली महिला गतविजेती ठरली. 12 महिन्यांपूर्वी ऑल इंग्लंड क्लबमध्ये विजेतेपद पटकावून सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या वोंड्रोसोवाचा जेसिका बोजास मनेइरो हिने 6-4, 6-2 असा पराभव केला. ग्रास कोर्टवर हे ग्रँडस्लॅम जिंकणारी वोंड्रोसोवा गेल्या वर्षी पहिली बिगरमानांकित महिला खेळाडू ठरली होती.
मात्र, वोंद्रोसोवाने मंगळवारी नकोसा विक्रम आपल्या नावे केला. 1964 मध्ये सुरू झालेल्या या खेळाच्या खुल्या युगात फक्त एकदाच, गतवर्षी विम्बल्डन चॅम्पियन महिला खेळाडूला पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. अनुभवी स्टेफी ग्राफने 30 वर्षांपूर्वी लोरी मॅकनीलविरुद्ध या परिस्थितीचा सामना केला होता. वोंद्रोसोवा हिला यावेळी सहावे मानांकन मिळाले होते पण टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या वोंद्रोसोवा हिला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.
Wimbledon Open 2024 : सर्बियाचा स्टार टेनिसपटू जोकोविचची आगेकूच कायम..! सिन्नेर, ज्वेरेवही विजयी…
दुसरीकडे, जेसिकाने तिच्या तिसऱ्या ग्रँडस्लॅममध्ये गतविजेत्या खेळाडूचा पराभव केला. याआधी तिने दोन्ही ग्रँडस्लॅममध्ये पहिल्या फेरीतील सामने गमावले होते. जेसिकाने याआधी टूर स्तरावर ग्रास कोर्टवर एकही सामना जिंकला नव्हता आणि पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवलेल्या खेळाडूला देखील तिला पराभूत करता आले नव्हते.





