इच्छुक पुन्हा सैरभैर; ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे सगळ्यांचाच संभ्रम वाढला

सोशल मीडियावरील प्रचार थंडावण्याची चर्चा
निखील जगताप
बेलसर – पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. त्यासोबतच होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबतीत गट आणि गण रचना निश्चिती झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास पसंती दिली होतीे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून सोशल मीडियाच “प्रचार मीडिया’ झाला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा निर्णय पुढे ढकल्याने इच्छुक सैरभैर झाले असून संभ्रम ही वाढला आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावर आपली छाप उमटविण्यासाठी इच्छुक उमेदवार कार्यरत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात केली जात होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी कमी खर्च येत असल्याने इच्छुक उमेदवार सोशल मीडियाचा म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल साइट्सचा वापर पुरेपूर करून घेत होते. कमी कालावधीमध्ये अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सरळ व सोपा माध्यम मानले जात आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सऍप ग्रुप तयार करणे, त्यावर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना एकत्र करून प्रचार करण्यासही प्राधान्य दिले जात होते. या ग्रुपद्वारे व वैयक्तिक मेसेजद्वारे मतदारांशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवारांकडून केला जात होता. सोशल मीडियावर वाढदिवसा संदर्भात शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट टाकण्यासाठी सध्या चढाओढ सुरू होती; मात्र मिनी विधानसभेचे आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगित केल्याने सोशल मीडियावरील प्रचारही थांबणार का, असा प्रश्न आता उपस्थितीत केला जात आहे.
अनेक प्रश्नांची यादी तरीही…
इच्छुक उमेदवारांच्या समोर अद्याप अनेक प्रश्नांची यादी आहे. त्यामध्ये आरक्षण काय पडणार, राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न समोर असून देखील इच्छुक उमेदवारांना भावी या पदवीने संबोधले जात आहे.
पावसामुळे सोशल मीडिया जोमात
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले नव्हते; तर नगरपरिषदेच्या तारखा जाहीर झाल्या होत्या त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने सोशल मीडियाचा वापर जनसंपर्क वाढविण्यासाठी केला जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोशल मीडियावर वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, शुभेच्छा, श्रद्धांजली, निवडी बाबतच्या पोस्ट, आपल्या कार्यक्रमाबाबतीची अपडेट तर भेटीगाठी यांचे फोटो अपलोड करून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवण्यासचे काम इच्छुक उमेदवारांकडून केले जात होते; मात्रा आता आरक्षण तिढ्यामुळे इच्छुक कमालीचे अस्वस्थ झाले आहे.
आता पुढे काय?
अलीकडचा काळ सोशल मीडियाचा काळ म्हणून ओळखला जात असला तरी हे सर्वसामान्य मतदार हे खेड्यापाड्यात आहेत. त्यामुळे फक्त सोशल मीडियावर वर्चस्व म्हणजे मतदारांवर वर्चस्व असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याच्या पलीकडे जाऊन इच्छुक उमेदवारांना खेड्यापाड्यात जाऊन लोकांचे प्रश्न समजून त्यांच्या मनावर राज्य करणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीनेही उमेदवारांची लगबग सुरू होती; मात्र आता निवडणूक पुढे ढकल्या गेल्या तर पुढे काय, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.





