Satara | वासोटा दुर्ग 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार का ?

बामणोली, (प्रतिनिधी) – दरवर्षी 16 ऑक्टोबरपासून सुरु होणारे वासोटा किल्ला पर्यटन यावर्षी मोठया प्रमाणात पाऊस पडल्याने लांबले आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून ते सुरु होणार असल्याबाबत चर्चा सुरु असल्या तरी वनविभागाकडून याबाबत अधिकृत सूचना मिळाली नसल्याने पर्यटकांसह बोट व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
वन विभागाने संभाव्य दि. 1 नोव्हेंबर तारीख दिलेली असली तरी अजून बोट व्यवसायिक किंवा बोट क्लब संस्था यांना कोणत्याही स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. वन विभागाने 1 तारखेपासून किल्ले वासोटा पर्यटन सुरू करावे, अशी मागणी स्थानिकामधून होत आहे.
जिल्ह्याचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ व निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्स याचा आवडता वनदुर्ग म्हणून वासोटा किल्ल्याची ओळख आहे. जावळी तालुक्यातील दुर्गम भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे.
पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करणार्या वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. परंतु या वर्षी ऑक्टोबर महिना उलटून गेला तरी वासोटा किल्ला पर्यटनासाठी खुला झालेला नाही. दरवर्षी प्रमाणे 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत वासोटा किल्ला पर्यटनासाठी खुला केला जातो. परंतु, यावर्षी अधून मधून पाऊस असल्यामुळे पर्यटनासाठी खुला केला नाही.
सध्या पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे तरी ही वासोटा किल्ला पर्यटन खुला करण्यासाठी वन विभागाकडून कोणत्या प्रकारचा हिरवा कंदील मिळलेला नाही. वासोटा किल्ला पर्यटन फक्त 2 ते 3 महिनेच चांगल्या प्रकारे सुरू असते, ज्यावेळी कोयनेचे पात्र भरलेले असते त्यावेळी ट्रेक करण्यासाठी जास्त चालावे लागत नाही.
त्यामुळे गडप्रेमी,पर्यटक हे या 2-3 महिन्यात वासोटा येथे जाण्यासाठी आग्रह धरतात. परंतु वन विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारे स्पष्ट सूचना न मिळाल्याने बोट व्यवसायिक संभ्रमात आहेत. त्यामुळे बोट व्यवसायिक यांना मोठ्या आर्थिक फटका बसत आहे.
आमचा उदरनिर्वाह हा बोट व्यवसायावर अवलंबून आहे.वन विभाग 16 ऑक्टोबर ला वासोटा सुरू करतात. परंतु या वर्षी ऑक्टोबर महिना संपत आला तरी वासोटा किल्ला सुरू झालेला नाही. तरी वनविभागाने 1 तारखेलाच वासोटा किल्ला पर्यटनासाठी सुरू करावा.
लक्ष्मण विष्णू साळुंखे बोट चालक, ब्राविमश्वर बोट क्लब, शेंबडी.
दरवर्षी वासोटा किल्ला हा पर्यटकांना आकर्षित करत असतो, तसेच 16 ऑक्टोबर पासून पर्यटक चौकशी करत असतात परंतु वासोटा सुरू नसल्याने पर्यटक नाराज होत आहेत त्यामुळे आमच्या बोटिंग व्यवसायावर मोठा फटका बसत आहे. दिनकर भोसले, चेअरमन ,केदारेश्वर बोट क्लब मुनावळे
दि.16 ऑक्टोबरपासून बोटी तयार केलेल्या आहेत. परंतु वासोटा किल्ला पावसामुळे पुढे ढकलण्यात आला होता. तरी 1 तारखेला वासोटा सुरू करण्याबाबत वन विभागाच्या संस्थेच्या वतीने मागणी केली आहे. वासोटा सुरू करण्याबाबत वन विभागाने संमती दर्शवली आहे. तरी वासोटा किल्ला 1 तारखेला सुरू करतील अशी अपेक्षा आहे. धनाजी संकपाळ, चेअरमन, भैरवनाथ बोट क्लब बामणोली





