Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी पक्ष संघटना पुन्हा उभी करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थानी त्यांनी निवडणूक लढवलेल्या पक्षाच्या उमेदवारांसोबत महत्त्वाची समीक्षा बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी हेही उपस्थित होते. पराभवानंतर पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चा आणि वाढता असंतोष याच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे, त्यांनी जावं. मी पक्षाची पुन्हा उभारणी करेन,” असं मोठं विधान त्यांनी केलं आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत ममता बॅनर्जी म्हणाल्या, “जे दुसऱ्या पक्षात जात आहेत, त्यांना जाऊ द्या. माझा कोणालाही जबरदस्तीने रोखण्यावर विश्वास नाही. जे माझ्यासोबत आहेत, त्यांनी पक्ष कार्यालयांची दुरुस्ती करा, रंगरंगोटी करा आणि ती पुन्हा सुरू करा. गरज पडल्यास मी स्वतः रंगकाम करेन. तृणमूल काँग्रेस कधीही झुकणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रातील 2022 च्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेतील बंडावेळी उद्धव ठाकरे यांनीही “ज्यांना जायचं त्यांनी जावं” अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठं बंड झालं आणि शिवसेनेत फूट पडली होती. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्या विधानानंतर बंगालमध्येही तशाच प्रकारच्या राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे. Mamata Banerjee दरम्यान, बैठकीनंतर टीएमसीच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून फोटो आणि संदेश शेअर करण्यात आला. “ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी उमेदवारांची भेट घेतली. धमक्या आणि अत्याचारांना न जुमानता त्यांनी निवडणुका लढवल्या. तृणमूल काँग्रेस एक कुटुंब म्हणून एकजूट आहे,” असा दावा पक्षाकडून करण्यात आला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. 294 पैकी केवळ 80 जागांवर पक्षाला विजय मिळवता आला. पक्षाने लढवलेल्या 291 जागांपैकी 211 उमेदवारांचा दारुण पराभव झाला. अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनाही मतदारांनी नाकारले. सर्वात मोठा धक्का म्हणजे ममता बॅनर्जी यांनाच त्यांच्या भवानीपूर मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर टीएमसीने निवडणूक निकालांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. “जनतेचा कौल लुटला गेला,” असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला असून, पक्ष आता नव्याने उभारी घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत. हेही वाचा : Anjali Damania : गुवाहाटी दौरा, व्हायरल फोटो आणि तारखांचे गूढ! अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ