राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

मुंबई – महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या 135 केसेस आहेत, त्यापैकी 85 केसेस मुंबईत आहेत. महाराष्ट्राने याआधी चाळीस हजाराहून अधिक केसेस दररोज पाहिल्या आहेत. त्यामुळे आताची परिस्थिती ही नियंत्रणात आहे.
कोणतेही घाबरण्याचे कारण नाही. लसीकरण झाल्यामुळे सुरक्षा कवच मिळाले आहे. तसेच 12 ते 18 वर्षांच्या वयोगटातील लहान मुलांमध्ये लसीकरण वाढावे यासाठी प्रबोधन करत आहोत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
बुस्टर डोस आपण स्वतःहून देत नाही आहोत. पण ज्यांच्यात अँटीबॉडीज कमी असतील त्यांनी खासगी रुग्णालयातून बुस्टर डोस घेण्यास अडचण नाही. आज काळजी करण्याचा कोणताही विषय नाही. मास्क सक्ती आपण हटवली आहे, त्यासाठी दंड लावला जात नाही. मात्र कॉमोर्बिटिज असलेल्या लोकांनी मास्क वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.
पाश्चिमात्य देशात काही प्रमाणात केसेस वाढत आहेत. दिल्लीतही केसेस वाढलेल्या दिसत आहेत. आयसीएमआर, केंद्र सरकार आणि राज्याचा आरोग्य विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.





