Covid 19: कोरोनाच्या ‘BA.3.2’ या नव्या व्हेरियंटने (ज्याला ‘सिकाडा’ असेही संबोधले जात आहे) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अमेरिकेतील २५ राज्यांसह जगातील २३ देशांमध्ये या व्हेरियंटचा शिरकाव झाला असून अमेरिकेची आरोग्य संस्था ‘सीडीसी’ (CDC) आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यावर चिंता व्यक्त केली आहे. काय आहे ‘BA.3.2’ व्हेरियंट? हा व्हेरियंट ओमिक्रॉन कुटुंबातीलच एक उपप्रकार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा व्हेरियंट २०१२ नंतर गायब झालेल्या ‘BA.3’ मालिकेतील एक जुना दुवा आहे, जो आता अधिक प्रबळ होऊन परतला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये याचा पहिला रुग्ण आढळला होता. सध्या डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलँड्समधील नमुन्यांपैकी ३०% नमुने याच व्हेरियंटचे आढळत आहेत. म्यूटेशनमुळे वाढली भीती – या व्हेरियंटमध्ये ७० ते ७५ जनुकीय बदल (म्यूटेशन) झाले आहेत. विशेषतः याच्या ‘स्पाइक प्रोटीन’मधील बदलांमुळे हा विषाणू जुन्या संसर्गातून किंवा लसीकरणातून मिळालेल्या रोगप्रतिकारशक्तीला (Immunity) चकमा देण्यास अधिक सक्षम झाला आहे. परिणामी, हा व्हेरियंट इतर प्रकारांच्या तुलनेत अधिक संक्रामक असल्याचे मानले जात आहे. हेही वाचा – निवडणूक की पैशांचा खेळ? ‘या’ राज्यांमध्ये 400 कोटींचा माल जप्त; निवडणूक आयोगाचा कडक पहारा! प्रमुख लक्षणे आणि तीव्रता – डॉक्टरांच्या मते, ‘सिकाडा’ व्हेरियंटची लक्षणे जुन्या कोरोनासारखीच असली, तरी काही बदल प्रामुख्याने जाणवत आहेत. घशामध्ये तीव्र खवखव किंवादुखणे , खूप जास्त थकवा आणि शरीरात सतत वेदना जाणवणे. नाक गळणे, नाक बंद होणे आणि कोरडा खोकला. सौम्य किंवा तीव्र ताप आणि थंडी वाजून येणे, ही लक्षणे दिसत आहेत. लस प्रभावी ठरेल का? शास्त्रज्ञांच्या मते, या व्हेरियंटमधील प्रचंड म्यूटेशन्स पाहता सध्याची लस यावर किती प्रभावी ठरेल, याबाबत साशंकता आहे. सध्या हा व्हेरियंट ‘डेल्टा’सारखा जीवघेणा असल्याचे सिद्ध झाले नसले, तरी त्याचा वेगाने होणारा प्रसार पाहता याला ‘तत्काळ धोका’ मानून सावध राहण्याची गरज असल्याचे व्हायरोलॉजिस्टनी स्पष्ट केले आहे. प्रतिबंधात्मक उपाय – आरोग्य यंत्रणांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता राखणे आणि लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. भारतात अद्याप याचा मोठा धोका समोर आला नसला, तरी आंतरराष्ट्रीय विमानांमुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.