‘बजरंगी भाईजान’चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितले…

Bajrangi Bhaijaan Film | अभिनेता सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. 2015मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटात सलमान खानसोबत हर्षाली मल्होत्रा, करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा रंगली आहे. यातच आता या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खानने चित्रपटाच्या सीक्वलबाबत मोठे भाष्य केले आहे.
कबीर खान म्हणाला की, प्रत्येक ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सीक्वलची गरज नसते. याच कारणामुळे मी माझ्या फिल्मी करिअरमध्ये सीक्वल बनवला नाही. चित्रपटाचा सीक्वल तेव्हा बनवायला हवा, जेव्हा कोणती चांगली कथा मिळेल आणि ती पुढे मांडता येईल. जेव्हा तुम्हाला ती कथा पुढे नेण्यास योग्य अशी कथा सापडेल तेव्हाच सिक्वेल बनवायला हवेत.’
पुढे त्याने सांगितले की, जेव्हाही माझ्याकडे यशस्वी चित्रपट झाला, तेव्हा लोकांनी मला या चित्रपटाचा सीक्वल बनवण्यास सांगितले. न्यूयॉर्क, टायगर आणि बजरंगी भाईजान या चित्रपटांनंतर मला हे विचारण्यात आले. पण, मी असे कधीच केले नाही. त्यामुळे मी केवळ चित्रपट यशस्वी झाला म्हणून त्याचा सीक्वल बनवू नये, असे म्हणणारा पहिला माणूस आहे.
‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलबाबत कबीर म्हणाला की, ‘मी ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलवर काम करत असल्याचे कधीही म्हटलेले नाही. परंतु ‘बजरंगी’चा सिक्वेल बनण्यास पात्र असेल अशी कदाचित कधी एखादी चांगली स्क्रिप्ट आल्यास मला ते करायला आवडेल.पण, ती इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे म्हणून नाही.’
बजरंगी भाईजानच्या पहिल्या भागात सलमानसोबत करीना कपूर, हर्षाली मल्होत्रा, ओम पुरी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारखे स्टार्सही दिसले होते. या चित्रपटाने भारतात 320.34 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि जगभरात 700 कोटींहून अधिक व्यवसाय केला होता.
हेही वाचा:
शाहिद कपूर ‘हैदर’ दिग्दर्शकासोबत करतोय कमबॅक, ॲक्शन अवतारात दिसणार





